ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीत आपलं वेतन ठरवण्याची परवानगी आपल्यालाच आहे, असं कधी ऐकलंय का? स्वप्नातही अशी संधी आपल्याला मिळाली तर आपण स्वत:ला नशीबवान समजू. पण प्रत्यक्षात अशी कंपनी उपलब्ध आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना आपलं वेतन ठरवण्याची परवानगी देते. ग्रांटट्री असं या कंपनीचं नाव असून ही कंपनी लंडनमध्ये कार्यरत आहे. व्यावसायिक कंपन्यांना सरकारी निधी मिळवून देण्यात ही कंपनी मदत करते. या ठिकाणी काम करणाऱ्या एका महिलेने खुद्द आपले वार्षिक वेतन 27 लाखांवरून वाढवून 33 लाख रूपये केल्याची माहिती दिली.

सहा लाखांनी आपलं वेतन वाढवून घेण्याबाबत आपण द्विधा मन:स्थितीत होतो, अशी माहिती या कंपनीत काम करणाऱ्या सिसिलिया मंडुका हिनं दिली. दरम्यान, यासंदर्भात तिने आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनीदेखील याला होकार दिल्याचा ती म्हणाली. आपल्या सहकाऱ्यांना आपलं कामाचं स्वरूप बदललं आहे आणि दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक आपण मिळवलं आहे याची माहिती होती म्हणून त्यांनी त्वरित होकार दिल्याचे ती म्हणाली.

ग्रांटट्री या कंपनीत सध्या 45 कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला हवे तेव्हा आपले वेतन वाढवण्याची मुभा आहे. तसंच आपलं वेतन ठरवण्याचीही जबाबदारी ही संबंधित कर्मचाऱ्याचीच आहे. परंतु वेतन वाढवण्यापूर्वी ते करत असलेल्या कामाला अन्य कंपनीमध्ये किती वेतन दिले जाते, याची माहिती माहिती घ्यावी लागते. तसंच प्रत्येक कर्मचारी आपण किती प्रगती केली आहे कंपनी किती आर्थिक भार सहन करू शकते याचाही विचार करतो. त्यानंतर संबंधित कर्मचारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासमोर वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवतो. अन्य कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यास संबंधित कर्मचाऱ्याला वेतनवाढ देण्यात येते.