एखादा चित्रपट हिट करण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता यांच्याबरोबरच चित्रपटाशी संबंधीत प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी यासाठी त्याचा पाया भक्कम करणे गरज असते. यासाठी चित्रपटाची टीम प्रमोशनच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडत असतात. सध्या ‘दमिश्क टाईम्स’ या चित्रपटाच्या टीमनेही अशाच प्रकारे चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

सध्याच्या काळात आपल्या मित्रमैत्रीणींना प्रँकच्या माध्यमातून घाबरविण्याचा प्रकार जोरदार सुरु असतानाच ‘दमिश्क टाईम्स’च्या टीमनेही नागरिकांसोबत प्रँक करून त्यांना चांगलच घाबरवून सोडलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या चित्रपटातील कलाकारांनी आयसीसच्या दहशतवाद्यांसारखा पेहराव करुन तेहरानमधल्या एका मॉलमध्ये प्रवेश केला. हातात खोट्या तलवारी आणि बंदूका घेऊन ते ‘अल्लाह – हु- अकबर’च्या घोषणा देत मॉलमध्ये शिरले. प्रथमत: कलाकारांचा हा अवतार बघून मॉलमध्ये असलेले उपस्थित सर्वच नागरिक घाबरले होते. मात्र हे दहशतवादी नसून हा प्रँकचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

چطوری ایرانی

A post shared by pedram (@pedram_firuzi) on

‘दमिश्क टाईम्स’ हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेवर आधारित असून ही संघटना इराणमधील नागरिकांचे अपहरण करते. अपहरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या मदतीने ही दहशतवादी संघटना सिरीयावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या कलाकारांनी प्रमोशन करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब केला असला तरी यासंबंधीत प्रकारामुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. काही युजर्सला ही संकल्पना आवडली तर काही युजर्सनी यांच्यावर टीकेची झोड उठविली. परंतु एवढे सगळे करुन ‘दमिश्क टाईम्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरणार आहे हे येणारा काळच सांगेल.