‘मादाम तुसा’ संग्रहालयातील मेणाचे पुतळे जगप्रसिद्ध आहेत. एखादी व्यक्ती जगप्रसिद्ध असल्याशिवाय तिचा पुतळा या संग्रहालयात उभारला जात नाही. मात्र या संग्रहालयात चक्क एका मांजरीचा पुतळा तयार करण्यात आला आहे. मात्र ही मांजर काही साधीसुधी नाही. ही मांजर इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध आहे. ग्रंपी कॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मांजरीचा पुतळा या आठवड्याच्या शेवटी मादाम तुसा संग्रहालयात ठेवण्यात येईल.

एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर सोशल मिडीयावर अनेकदा ग्रंपी कॅटच्या छायाचित्राचा आधार घेतला जातो. ग्रंपी कॅटच्या चेहऱ्यावरचे भाव अनेकदा सोशल मिडीयावर वापरले जातात. त्यामुळेच ग्रंपी कॅट संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. म्हणूनच ग्रंपी कॅटचा मेणाचा पुतळा या आठवड्यात मादाम तुसा संग्रहालयात ठेवला जाणार आहे. याशिवाय ब्रॉडवेच्या म्युझिकल शोमध्ये सहभागी होण्याची संधीदेखील ‘ग्रंपी’ला मिळाली आहे.

मादाम तुसा संग्रहालयात अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे आहेत. गेल्याच आठवड्यात ‘ग्रंपी’ने या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी ग्रंपीने संग्रहालयात असणाऱ्या अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या पुतळ्यांसोबत फोटोशूट केले. अब्राहम लिंकन, जॉन केनेडी आणि रोनाल्ड रेग यांच्यासोबत ग्रंपीने फोटो काढले. यावेळी ग्रंपीच्या मालक तबाथा बंडसन यांना या संपूर्ण घटनांबद्दल ग्रंपीची काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘या सगळ्यामुळे ग्रंपीला आनंद झाला आहे. तुम्ही तिच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहू शकता’, अशा शब्दांमध्ये बंडसन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेच्या राजधानीला भेट देणाऱ्या ग्रंपीचा पुढील मुक्काम न्यूयॉर्कमधील ब्रॉडवेत होता. या ठिकाणी ग्रंपीने एका संगीताच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी ग्रंपीचे जोरदार स्वागत केले.

टारडर सोस नावाच्या मांजरीचे छायाचित्र पहिल्यांदा २०१२ इंटरनेटवर प्रसिद्ध झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी टारडर सोसचे ग्रंपी कॅट असे नामकरण केले. त्यानंतर ग्रंपी कॅट याच नावाने टारडर सोस इंटरनेटवर ओळखली जाऊ लागली.