जगभरातील विविध धर्म आणि संस्कृतींची स्वतंत्र अशी काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वैशिष्ट्यांसाठी संबंधित धर्माचे लोक तितकेच संवेदनशील असल्याचे पाहायला मिळते. इतकेच नाही तर काही परंपरागत वैशिष्ट्यांमुळे त्या त्या धर्मीयांची एक ओळख निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, इस्लाम धर्मीयांची गोल इस्लामिक टोपी, ख्रिश्चन धर्मीयांचा क्रॉस किंवा शिख बांधवांची पगडी. शिख बांधवांसाठी पगडीचे अनन्यसाधारण महत्त्व असताना एका फॅशन शोमध्ये मॉडल्सना पगडी बांधून रॅम्पवर आणल्याची घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिलान फॅशन वीकमध्ये पगडी बांधलेल्या मॉडल्सना रॅम्पवर आणणे ‘गुची’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन ब्रँडला महागात पडले.

शिख बांधवांनी मॉडल्सच्या पोशाखावर आक्षेप नोंदवर सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. पगडी ही शिख संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून फॅशन म्हणून तिचा वापर करणे अयोग्य आहे, असे शिख बांधवांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते हरजिंदर सिंग कुकरेजा यांनी ‘गुची’वर संताप व्यक्त करत ट्विट केले की, ‘पगडी ही शिख बांधवांसाठी त्यांच्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मॉडल्ससाठी फॅशन अॅक्सेसरी म्हणून पगडीचा वापर करणे अयोग्य आहे. एखाद्या टोपीप्रमाणे तुमच्या मॉडल्सनी पगडी डोक्यावर घातली आहे. बनावट पगडी घालणे हे गुचीच्या बनावट उत्पादनांची विक्री करण्यापेक्षाही वाईट आहे.’

PHOTO : जगातली सर्वांत लहान आकाराची पेन्सिल पाहिलीत का?

कुकरेजा यांच्या ट्विटनंतर अनेकांनीच गुचीविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यामध्ये काहीजण कुकरेजा यांच्याही सहमत झाले. तर ‘गुची’ने कोणत्याही प्रकारे पगडीचा अपमान केला नाही असे काहींनी म्हटले.