चोर चोरीसाठी चोर कायमच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. मग आपण केलेल्या कामात यश मिळाल्यानंतर त्याचा आनंदही साजरा व्हायला हवाच ना. चोरांनी हा आनंद चक्क डान्स करुन साजरा केला. चोराने केलेल्या हा डान्स सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली असून या व्हिडियोबाबत जोरदार चर्चा होताना दिसत आहे. घर लुटायला आलेल्या ५ जणांच्या गँगमधील एकाने इमारतीत लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा पाहीला आणि तो डान्स करायला लागला. डान्स करताना चोराने आपल्या अंगावर चादर घेतल्याचेही यामध्ये दिसत आहे.

सुरुवातीला ५ चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घरात दाखल झाले. त्यावेळी एका चोराने अंगावर चादर घेतली होती. जेव्हा चोर चोरी करुन इमारतीच्या खाली येतात तेव्हा त्यातील एक जण सीसीटीव्ही कॅमेरा पाहतो आणि चादर अंगावर घेऊन डान्स करायला लागतो. यावेळी बाकीचे चार जण मात्र शांतपणे इमारतीच्या बाहेर निघून जाताना दिसत आहेत. हा व्हिडियो आल्यानंतर या चोरांनी दोन घरात चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही घरांमध्ये या चोरांनी रोख आणि दागिने यांची चोरी केली आहे. पोलिसांनी अज्ञान चोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडियो पाहून चोरांना आपण चोरी केल्याचा काहीच वाटत नसल्याचे दिसते. याआधी कॅलिफोर्नियातील एका चोराने चोरी करुन झाल्यानंतर ब्रेकडान्स केला होता, तोही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तर दिल्लीतील एका दुकानाबाहेरही चोरी करण्याआधी एका चोराने केलेला डान्स कॅमेरात कैद झाला होता.