गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी एक ठरलेलं लग्न पार पडण्याआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील फरार झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. पण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. पळून गेलेले ते दोघंही आता परतले आहेत. मात्र, त्या महिलेच्या पतीने आता तिला स्वीकारण्यास नकार दिलाय. पतीने नकार दिल्यामुळे महिलेने पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.

गुजरातच्या सूरत येथील काटरगाम गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह नवसारीतील एका तरुणीशी होणार होता. येत्या फ्रेबुवारीत हा विवाह होणार होता. दोघे लग्नाची तयारी करत होते. दोघेही एकाच समाजाचे असल्याने सर्व परंपरा सारख्याच असल्याने मोठ्या उत्साहाने लग्नाची तयारी सुरु होती. मात्र लग्न अगदी एका महिन्यावर आले असतानाच मुलाचे वडील आणि मुलीची आई एकमेकांबरोबर पळून गेल्याची घटना घडली होती. दोघांच्या पळून जाण्याने दोन्ही कुटुंबाची चांगलीच पंचाईत झाली होती.  व्याही आणि विहिण होऊ पाहणारे दोन जण पळून गेल्याने त्यांच्या मुलांचं होऊ घातलेलं लग्न मोडलं. त्यानंतर दोघे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली.

आणखी वाचा (मृत्यूच्या 2 दिवसआधी दिली होती ऑडिशन, झालं होतं सिलेक्शनही ; पण…)

त्यानंतर दोन्ही कुटुबीयांनी दोघांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळवली. लहानपणी ते दोघे एकमेकांचे शेजारी होते, दोघांमध्ये तरुणपणी प्रेमसंबंध होते. पण समाजाच्या भीतीपोटी त्यांनी लग्न केलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी नवसारी येथे तरुणीचं लग्न जमलं आणि ती सासरी निघून गेली. पण अनेक वर्षांनी दोघांच्या कुटुंबात मुला-मुलीच्या लग्नाच्या चर्चेवेळी त्यांची पुन्हा भेट झाली आणि त्यांच्या प्रेमाला नवी पालवी फुटली. नंतर आपल्या मुला-मुलीचा विचार न करता दोघेही पळून गेले. पण, आता पळून गेलेले ते दोघेही परत आले आहेत. मात्र, परतल्यानंतर या महिलेला स्वीकारण्यास तिच्या पतीने नकार दिला आहे. त्यामुळे तिने पोलिसात नवऱ्याची तक्रार केली आहे.