प्रेमात असताना तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काय काय केलं आहे? म्हणजे भेटवस्तू घेणं, एकत्र राहण्याचं वचन देणं, कविता करणं वगैरे वगैरे गोष्टी तुम्ही केल्याच असतील. मात्र तुम्ही कधी तुमच्या प्रेयसीला परिक्षेचं टेनशन आलयं म्हणून स्वत: मुलीच्या वेषात तिचा पेपर देण्यासाठी गेला आहात का? आता तुम्ही म्हणाला काय वेड्यासारखा प्रश्न आहे हा. एवढा वेडेपणा कोण करेल? पण खरोखर असा वेडेपणा केला आहे काझाकिस्तानमधील एका २० वर्षीय तरुणाने.

आयन झेडडोव्ह या तरुणाने चक्क मुलीची कपडे घालून आपल्या प्रेयसीच्या जागी परिक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी गेला. १७ वर्षीय प्रेयसीला पेपरचं टेन्शन आल्याने त्याने ही शक्कल लडवल्याचं सांगितले. कझाकिस्तानमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापिठामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी देशातील सर्व विद्यार्थ्यांची एक प्रवेश परिक्षा घेतली जाते. याच परिक्षेमध्ये आयनने हा प्रताप केला मात्र तो पकडला गेला.

आयन परिक्षा केंद्रामध्ये मुलीची वेशभूषा करुन गेला. काळ्या रंगाच्या केसांचा विग, पाढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि राखाडी रंगाचा स्कर्ट घालून तो पेपर देण्यासाठी गेला. इतकचं नाही तर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मुलींप्रमाणे मेकअपही केला होता. मात्र हुशार पर्यवेक्षकांनी पेपर देण्यासाठी आलेली व्यक्ती आणि नोंदणी करण्यात आलेली व्यक्ती वेगळी असल्याचं लगेच ओळखलं. संशय आल्याने आयनला वर्गाबाहेर चौकशीसाठी नेण्यात आले तेव्हाही त्याने मुलीच्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही फसल्याने त्याचे बिंग फुटले. मुलीच्या ऐवजी तिचा प्रियकर परिक्षेसाठी आल्याचे समजल्यानंतर शिक्षकांनाही धक्काच बसला. ‘आधी आम्हाला त्या मुली ऐवजी कोणीतरी वयाने मोठी मुलगी परिक्षा देण्यासाठी आली असं वाटलं. पण ती मुलगी नसून मुलगा आहे याचा आम्ही विचारही केला नव्हता. तो बोलेपर्यंत आम्ही त्याला मुलगीच समजत होतो’, असे मत एका शिक्षिकेने व्यक्त केले आहे.

आयनला एक लाख २३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. एकीकडे या प्रकरणावरुन टिका होत असतानाच या प्रेमविराला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ओल्जहॅस या उद्योजकाने तर दंडाची अर्धी रक्कम भरण्याची तयारीही दर्शवली आहे. प्रेम आजही जिंवत असून ते सिद्ध करायला लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच या घटनेतून दिसून आल्याने आपण दंडाची अर्धी रक्कम भरण्यास तयार असल्याचे हा उद्योजक म्हणाला. स्थानिकांनी तर या मुलाला ‘रोमॅन्टीक ऑफ द इयर’ अशी मजेशीर उपमाच दिली आहे. या मुलाला दंड ठोठावून सोडण्यात आले असले तरी त्याच्या १७ वर्षीय प्रेयसिला आता थेट पुढील वर्षी ही प्रेवश परिक्षा देता येणार आहे.