तुमचं प्रेम खरं असेल तर कितीही अडचण आली तरी तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही. याच वाक्याचा प्रत्यय नुकताच एका घटनेवरुन आला. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी तिला प्रपोज करण्यासाठी त्याने खास रिंग खरेदी केली होती. ही रिंग घालतानाच ती अचानक खाली पडली आणि त्यांच्या खाली असणाऱ्या एका गटारात ती गेली. आता आपल्या प्रेयसीसाठी आणलेली रिंग अशाप्रकारे खाली पडल्याने हे दोघेही काहीसे हताश झाले. मग या मुलाने पडलेली रिंग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्नही फोल ठरला.

ही घटना इथेच संपली नाही, तर ही सर्व घटना न्यूयॉर्क टाइम्सच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. न्यूयॉर्क पोलिसांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी त्यावर लगेचच या विषयाचा तपास सुरु केला. विशेष म्हणजे पोलिसांनी अतिशय कष्टाने गटारातून ही रींग शोधून काढली. या जोडप्याला रिंग सापडत नसल्याने त्यांनी आशा सोडून दिली आणि ते याठिकाणहून निघूनही गेले. आता पोलिसांपुढील मुख्य आव्हान होते ते म्हणजे या जोडप्याला शोधून काढणे. पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन कपलच्या शोधमोहिमेचा व्हिडियो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर पोलिसांनी रिंग सापडल्याचेही ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. तरीही कोणताच प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी आधीच्या व्हिडियोवरुन या जोडप्याचे दोन फोटो काढले आणि ते ट्विट केले. जेणेकरुन या दोघांना ओळखणाऱ्या लोकांमार्फत त्यांची रिंग सापडल्याचे त्यांना समजू शकेल.

अखेर या दोघांनाही आपली हरवेली रिंग मिळाल्याचे समजले आणि त्यांच्या आनंदाला पारावर राहीला नाही. त्या दोघांनी पोलिसांकडे जाऊन आपली ओळख पटवून दिली आणि रिंग घेतली. पोलिसांनी इतका पाठपुरावा करुन ही रिंग मिळवल्याने या दोघांनीही पोलिसांचे मनापासून आभार मानले. ही रिंग घेऊन त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत अखेर ही रिंग घातली. त्यामुळे त्यांच्या खऱ्या प्रेमाची पावती त्यांना मिळाली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारची कमाल करु शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.