सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असतात. त्यातही सध्या मराठी मिम्सची पेजेसही चांगलीच चर्चेत आहे. मध्यंतरी मराठी मुलं मुलींशी ऑनलाइन चॅट करताना कसं बोलतात यासंदर्भातील एक मिम चांगलच व्हायरल झालं होतं. मराठी मुलं सामान्यपणे, “हाय… जेवलीस का” या वाक्याने मुलींशी गप्पा सुरु करतात असं या मिममध्ये दाखवण्यात आलेलं. या मिमला हजारोच्या संख्येने लाइक्स आणि शेअर मिळाले होते. मात्र खरोखरच फेसबुकवरुन बोलता बोलता प्रेमात पडले आणि नंतर लग्नबंधनात अडकलेली अनेक उदाहरणे आपल्याला अजूबाजूला पहायला मिळतात. इंग्लंडमधील एका व्यक्तीनेह त्याची एकदम भन्नाट आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी ट्विटरवर शेअर केली आहे. सध्या ही लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे.

झालं असं की या व्हायरल स्टोरीतील नायक म्हणजे ज्याने हे ट्विट शेअर केलं आहे तो जॅक (ट्विटरवर @JakeBull23) एका मुलीच्या प्रेमात होता. अनेक दिवस या मुलीशी संवाद साधण्याच्या संधीची तो वाट पाहत होता. अखेर त्याने थेट या मुलीला मेसेज केला. मात्र सामान्यपणे हाय असा मेसेज करण्याऐवजी त्याने बंजी जंपिग सूटमधला उडण्याचा सराव करतानाच फोटो या मुलीला पाठवला. या फोटोवर ‘फ्लाइज इट टू यूआर डीएम’ म्हणजेच चूकून उडत तुझ्या पर्सनल मेसेजमध्ये आलो, असं म्हटलं होतं. २०१६ साली केलेल्या या मेसेजला समोरच्या मुलीने हसण्याचा रिप्लाय करत ‘मी तुला पकडलं’ असं सांगितलं.

त्यानंतर या दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या ते प्रेमात पडले आणि चार वर्षांनी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं. प्रपोजलचा फोटोही या तरुणाने पोस्ट केला आहे. त्याने पहिल्यांदा या मुलीला मेसेज केल्यानंतर झालेले संवाद आणि चार वर्षानंतर त्याच मुलीला प्रपोज करण्याचा फोटो शेअऱ करत, “२०१६ साली पाठवलेल्या या मेसेजपासून हे सर्व सुरु झालं. त्यानंतर चार वर्षांनी आज आमचा साखरपुडा झाला आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. इतकचं नाही त्याने पुढे लिहिताना विचारायला घाबरु नका असा सल्लाही प्रेमवीरांना दिला आहे. सध्या हे ट्विट चांगलचं व्हायरल झालं आहे. सात दिवसामध्ये चार हजारहून अधिक जणांनी हे ट्विट शेअर केलं आहे.

या ट्विटवर शेकडो प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी या तरुणाकडे सल्ले मागितले आहेत.