मध्‍य प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे. एका म्हशीने नवीन रस्त्यावर शेण टाकल्यामुळे चक्क त्या म्हशीच्या मालकाला १० हजार रुपये दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये हा विचित्र प्रकार घडलाय. इथे ग्वालियर महानगरपालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरू होतं. त्यावेळी बेताल सिंग नावाच्या डेअरी मालकाच्या एका म्हशीने रस्त्यावर घाण केली. त्याचवेळी रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तिथे पोहोचले, नव्या रस्त्यावर म्हशीने शेण केल्याचं त्यांनी पाहिलं आणि म्हशीच्या मालकाला दंड ठोठावण्याचा आदेश दिला.

याबाबत ग्वालियर महापालिकेचे अधिकारी मनीष कनोजिया यांनी सांगितलं की, “शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. रस्त्यावर आणि शहरातील इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना आम्ही दंड ठोठावतोय. स्वच्छतेबाबतही जागरुक करत आहोत. काल रस्त्याचं थोडं काम सुरू होतं…बेताल सिंगच्या म्हशी रस्त्यावर फिरत होत्या…सांगूनही त्याने म्हशींना हटवलं नाही….नंतर आम्हाला बेताल सिंगविरोधात कारवाई करत १० हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले. डेअरी मालकानेही स्वतःची चूक मान्य केली असून महापालिकेच्या कार्यालयात दंड भरला आहे”, अशी माहिती कनोजिया यांनी दिली.