आपल्या आजूबाजूला अनेकदा आपल्याला असे काही लोक दिसतात ज्यांचं राहणं, वागणं, बोलणं एकंदरच सामान्य माणसांपेक्षा थोड वेगळंच असतं. ते नीट का नाही राहत? त्यांना चांगले कपडे घालून वावरायला काय होतं? असे प्रश्न आपल्या मनात येतात. पण कदाचित त्यांचं अशा अजागळ राहण्यामागची कारणं अनेक असू शकतात. कदाचित ही माणसं तणावातून जात असतील आणि याचाच परिणाम त्यांच्या वागण्यावर दिसत असेल याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनात येत नाही. एका सोळा वर्षांच्या मुलीबाबातही असंच झालं. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिने स्वत:चे केस विंचरलेही नव्हते. तिचे ते पिंजरलेले खराब केस आणि तिचा एकंदरच अवतार पाहून अनेकजण तिला हसायचे, आधीच डिप्रेशन त्यातून लोकांच्या तिरकस नजरांना कंटाळून ती एकेदिवशी सलॉनमध्ये पोहोचली.

‘डोक्यावरचे माझे सगळे केस कापून टाका, मला या केसांचा नको इतका त्रास होत आहे’ अशी विनंती तिने हेअरड्रेसरला केली. खरं तर क्लाएंट जे काही सांगतील ते हेअरड्रेसर ऐकतातही पण सलॉनमधल्या केली या हेअरड्रेसरनं मात्र तिचं ऐकलं नाही. ही मुलगी डिप्रेशनमध्ये आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून तिने केसात कंगवाही फिरवला नाही, ना त्यांची काळजी घेतली हे तिच्या पटकन लक्षात आलं. डिप्रेशनमुळेच ती आपले केस कापण्याचा विचार करत आहे हे तिला समजलं . तेव्हा केलीनं तिच्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. तिनं जवळपास १३ तास या मुलीवर मेहनत घेऊन तिचं केस पुन्हा होते तसे सुंदर करुन दिले. हे फोटो पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही असेच होते.

केलीनं याचा फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केलाय. अनेकदा मुलं डिप्रेशनमध्ये असतात पण त्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं किंवा पालकांच्यांही ती बाब लक्षातही येत नाही. या मुलीबाबातही असंच झालं. पण केलीनं मात्र संयम ठेवून तिच्यावर दोन दिवस मेहनत घेतली आणि ती खरंच खूप सुंदर आहे हे जगाला दाखवून दिलं.