अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांनी साऱ्या जगाला आपल्यामध्ये सारे काही अलबेल आहे असं कितीही दाखवायचा प्रयत्न केला तरी या नवरा बायकोमधील लुटूपुटूची भांडणं काही लपून राहिली नाहीत. खुद्द मेलानियाने आपल्या छोट्या छोट्या कृतीतून हे जगाला दाखवून दिलंय. त्यामुळे त्यांच्यामधली हे ‘तू तू मै मै’चं भांडणं कॅमेरात कैद झाली नाही तर नवल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मेलानियानं पुन्हा एकदा ट्रम्प यांचा हात हातात घेण्याचं टाळलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरचा संकोचलेपणा यामुळे लपून राहिला नाही.

पण, सुदैवानं आपण ट्रोल होऊ शकतो हे लक्षात येताच मेलानिया यांनी काही सेकंदानं आपला हात ट्रम्प यांच्या हातात दिला. पण तत्पुर्वी हे सारं कॅमेरात कैद झालं होतं. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन आणि फस्ट लेडी ब्रिगेटी यांचं व्हाइट हाऊसमध्ये स्वागत करताना हा प्रकार घडला. ट्रम्प यांचा हात झटकून देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तेल अविवमध्ये मेलानिया यांच्या अशा वागण्यानं ट्रम्प यांची चांगलीच नाचक्की झाली होती. इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे त्यांच्या पत्नीसह ट्रम्प दाम्पत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. विमानतळावरुन बाहेर पडत असताना नेतान्याहू त्यांच्या पत्नीचा हात पकडून चालत होते. ट्रम्प यांनीदेखील मेलानिया यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण मेलानिया यांनी ट्रम्प यांचा हात झटकला आणि त्या पुढे निघून गेल्या.

तेल अविवमधला हा प्रसंग व्हायरल होऊन काही तास उलटत नाही तोच आपल्या वागण्याची पुनरावृत्ती मेलानिया यांनी केली होती. रोममध्ये त्यांचं विमान उतरल्यानंतर मेलानियाला खाली उतरण्यासाठी ट्रम्प यांनी आपला हात दिला. पण आपण त्यांच्याकडे पाहिलंच नाही अशा अविर्भावात मेलानियाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.