कधी कधी आयुष्याचा कंटाळा येतो. हे काय आपल्यापुढे वाढून ठेवलंय असा विचार येतो. हे आपल्यालाच का? आपणच का एवढे दु:खी असं सतत वाटत राहतं. अनेकदा आयुष्यात त्रास असतोही. पण बऱ्याच वेळ आपण आपल्या हातातलं काम टाळण्यासाठी, त्याच्यापासून दर पळण्यासाठी उगाचच नशिबाला दोष देत बसतो. परिस्थिती तेवढी वाईट नसतेही पण फक्त आळस करायचा म्हणून ती परिस्थिती न स्वीकारता तिच्याशी न लढता आपण स्वत:चं दु:ख कुरवाळत बसतो.

आपलंच आयुष्य एवढं दु:खी का? असा विचार जेव्हा जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा आठवा ‘टियो सात्रिओ’ला. इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या  टियोला जन्मापासून दोन्ही हात आणि पाय नाहीत. जेव्हा तो जन्माला आला, तेव्हा त्याच्या आईला त्याच्या स्थितीबद्दल सुरूवातीला सांगितलं नव्हतं. टियोच्या परिस्थितीबद्दल त्याच्या आईला खरी गोष्ट कळल्यावर ती सुरूवातीला उदास झाली, पण तिने आणि टियोच्या वडिलांनी आहे ती परिस्थिती स्वीकारायचं ठरवलं आणि आपल्या मुलाला अतिशय प्रेमाने वाढवायला सुरूवात केली.

आता १२ वर्षांच्या असणाऱ्या टिओला व्हिडिओगेम खेळायला खूप आवडतं. आता हात आणि पाय नसलेला टिओ व्हिडिओ गेम कसा काय खेळू शकतो असा विचार मनात येणं साहजिक आहे. पण आपल्या अपंगत्वाचा त्याने त्याच्या व्हिडिओगेम खेळण्याच्या आवडीवर परिणाम होऊ दिला नाही. आपल्या पूर्ण ताकदीनिशी तो व्हिडिओगेम खेळतो.

टिओ शाळेतही हुशार आहे. त्याची अभ्यासात चांगली गती असल्याचं त्याचे आईवडील आणि शिक्षक सांगतात. त्याचं शालेय शिक्षण सुरू झालं तेव्हा त्याच्या अपंगत्त्वामुळे त्याला सुरूवातीला त्रास झाला. पण नंतर त्याच्या शाळेतल्या मुलांचं मन त्याने जिंकलं आणि कुठल्याही दुसऱ्या एका मुलाप्रमाणे तो जीवन जगू लागला.

परिस्थितीवर मात करायला फार काही लागत नाही. फक्त आहे त्या परिस्थितीला शरण न जाण्याची वृत्ती लागते. टिओ सात्रिओकडे पाहून याचीच प्रचिती येते.