भारत-इंग्लंड संघांमध्ये सुरू असलेल्या चेन्नई कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने ५७८ धावांचा डोंगर उभारला. त्यांच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच्या ६ बाद 298 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी फलंदाजीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या डावात हरभजन सिंहची नक्कल करत गोलंदाजी करतानाचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओवर आता स्वतः भज्जीनेच मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

पहिल्या डावात इंग्लंडच्या जो रुटने द्विशतकी खेळी केली. सपाट खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकूश ठेवण्यात अपयश आलं होतं. प्रमुख गोलंदाज थकलेले होते, त्यामुळे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानीआधी विराट कोहलीने सलामीचा फलंदाज रोहित शर्माला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितनेही गोलंदाजीचा आनंद लुटला, आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. चहापानाआधीचा अखेरचा चेंडू टाकताना तर रोहित शर्माने दिग्गज गोलंदाज हरभजन सिंह याच्या गोलंदाजीची नक्कल केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर आता खुद्द हरभजनने प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल व्हिडिओ ट्विट करताना हरभजनने रोहितला टॅग केलं आणि त्यासोबत फक्त ‘शाणा’ असं लिहिलं. सोबत हसण्याचे आणि टाळ्या वाजवतानाचे इमोजीही त्याने वापरलेत. खाली बघा हरभजनची प्रतिक्रिया आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ :-

रोहित शर्मानं हरभजन सिंहच्या गोलंदाजीची केलेल्या नक्कलची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी रोहित शर्माच्या गोलंदाजीचं कौतुक करत आहेत, सोबतच भज्जीच्या ट्विटवरही विविध प्रतिक्रिया देत आहेत.