इतिहासात सर्वात काळ चाललेला खटला अशी नोंद झालेल्या अयोध्येतील वादावर मागील वर्षी तोडगा निघाला. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मशिद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यात आली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या दरम्यान पाच एकर जागेवर बाबरी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डानं घेतल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे वृत्त खरंच आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल झालेल्या निर्णयाविषयी सत्येतीविषयी इंडिया टुडेनं शहानिशा करून (सत्यता पडताळून) वृत्त दिलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू असताना बाबरी मशिदीसाठी दिलेल्या जागेवर हॉस्पिटल उभारणार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं. फेसबुकवरील अनेकांनी हे वृत्त शेअर केलं. विशेष म्हणजे वृत्ताबरोबरच मशिदीसाठी देण्यात आलेल्या जागेवर कशा पद्धतीचं हॉस्पिटल बांधलं जाणार आहे, त्यांचं संकल्पचित्रही शेअर करण्यात आलं होतं.

“सर्वोच्च न्यायालयानं जी पाच एकर जागा दिली आहे. त्या जागेवर बाबरी हॉस्पिटल उभारण्याचा सुन्नी वक्फ बोर्डानं असा निर्णय घेतला आहे. हे हॉस्पिटल एम्ससारखंच असेल आणि तिथे मोफत आरोग्य सेवा दिली जाईल. प्रसिद्ध डॉक्टर काफिल खान यांना या रुग्णालयाचं प्रशासक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील पूर्ण एक मजला लहान मुलांसाठी आरक्षित असणार आहे. ज्या ठिकाणी मुलांवर उपचार केले जातील,” असा मजकूर असलेला हा मेसेज व्हायरल झाला. त्याची पडताळणी केली असता हा व्हायरल झालेला संदेश चुकीचा असल्याचं समोर आलं. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानं “हा व्हायरल झालेला संदेश खोटा आणि त्याला कसलाही आधार नाही,” असं म्हटलं आहे. पाच एकर जागेवरील बांधकामाविषयी बोर्डानं अजून कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं सुन्नी वक्फ बोर्डानं स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Has sunni waqf board decided to build babri hospital on the 5 acre land allotted in ayodhya bmh
First published on: 08-08-2020 at 21:55 IST