करोना महासाथीमुळं रेल्वे आणि बससह इतर प्रवासाची साधनं उपलब्ध नसताना एका तरुणानं आपल्या पत्नीच्या परीक्षेसाठी तिला घेऊन स्कूटरवरुन चक्क १२०० किमीचं अंतर कापलं. विशेष म्हणजे गर्भवती असणाऱ्या पत्नीची डीएड करण्याची इच्छा त्यानं पूर्ण केली. या दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

या दाम्पत्याने झारखंडच्या गोंडा जिल्ह्यातून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर दरम्यान बाराशे किमीचा प्रवास केला. त्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनेही त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने या दाम्पत्याला आर्थिक मदत करत या आदिवासी दाम्पत्याला सुरक्षितरित्या झारखंडला पोहोचवण्याची व्यवस्थाही केली आहे.

झारखंडच्या गोंडा जिल्ह्यात गंटा टोला गावाचे रहिवासी असलेले धनंजयकुमार (वय २७) आपली गर्भवती पत्नी सोनी हेम्बरम (वय २२) यांना स्कूटरवरुन डीएडच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी बाराशे किमी अंतर पार करत ग्वाल्हेरला घेऊन आले. धनंजय यांनी सांगितले, “लॉकडाउनमुळं बस आणि रेल्वे गाड्या बंद होत्या. तसेच पत्नी सहा महिन्यांची गर्भवती होती. तरीही त्यांनी स्कूटरवरुनच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पत्नी सोनी हिने सुरुवातीला यासाठी नकार दिला. मात्र, त्यानंतर ती तयार झाली. आम्ही टॅक्सीने आलो असतो तर सुमारे ३० हजार रुपये खर्च झाले असते जे माझ्याकडे नव्हते. त्यामुळे आम्ही स्कूटरवरुन जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात आम्हाला अनेक अडचणींचा समाना करावा लागला. विशेषतः बिहारमध्ये कारण तिथं मुसळधार पावसामुळं रस्त्यात खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागला. त्याचा पत्नीला त्रासही सहन करावा लागला. मात्र, सावकाश स्कूटर चालवत मुजफ्फरूपर आणि लखनऊमध्ये रात्र काढत ३० ऑगस्ट रोजी आम्ही ग्वाल्हेरला पोहोचलो. गोंडाहून २८ ऑगस्ट रोजी पहाटे आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती.”

ग्वाल्हेरमध्ये दीनदयाळ नगरमध्ये या दाम्पत्याने १५ दिवसांसाठी १५०० रुपयांमध्ये भाड्याने एक खोली घेतली आहे. तिथे पद्मा गर्ल्स स्कूलमध्ये सोनी यांचं परीक्षा केंद्र असून ही परीक्षा ११ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. धनंजय यांनी सांगितलं की, ते स्वतः आठवी पास असून एका केटररजवळ कूकचं काम करतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याचा सोनी यांच्यासोबत विवाह झाला.

सोनी म्हणाल्या, “पहिल्यांदा ग्वाल्हेरकडं येताना अडचणींमुळं असं वाटलं होतं की, मी परीक्षा देऊ शकणार नाही. मात्र, त्यानंतर पतीची हिंमत पाहून मी तयार झाले. रस्त्यात पावसामुळं थोडी अडचण झाली. त्यामुळं अंगात थोडा तापही भरला होता. मात्र, आता सर्वकाही ठीक आहे. झारखंडमध्ये जशा शिक्षकांच्या जागा निघतील तेव्हा आपण अर्ज करणार आहोत आणि यात नक्कीच माझी निवड होईल असा विश्वासही सोनी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर ग्वाल्हेर प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या. ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिला सशक्तीकरण अधिकारी शालीन शर्मा यांना तात्काळ या दाम्पत्याजवळ पाठवले. सध्या रेडक्रॉसच्यावतीनं या दाम्पत्याला पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना सुरक्षित त्यांच्या गावी पाठवण्याचे प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत, असे शर्मा यांनी सांगितले. त्याचबरोबर त्याचं जेवण आणि सध्या ते जिथे थांबले आहेत तिथल्या घराचं भाडंही प्रशासन भरणार आहे. सोनी या गर्भवती असल्याने त्यांची खास काळजी घेतली जात आहे. सध्या दररोज पेपर असल्याने रविवारी सोना यांची आरोग्य तपासणी आणि अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाणार आहे.