प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या जिव्हाळ्याचा अशा काही गोष्टी किंवा वस्तू असतात ज्या त्याच्यापासून लांब गेल्या तर व्यक्ती प्रचंड अस्वस्थ होते. मात्र काही असेही महाभाग असतात ज्यांना एखाद्या गोष्टीचा सहज विसर पडतो. विशेष म्हणजे या गोष्टींचा असा काही विसर पडतो कि बराच काळ लोटल्यानंतर त्याची आठवण येते. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जर्मनीमध्ये असाच एक किस्सा घडला असून हा प्रकार ऐकल्यावर कोणालाही हसू फुटेल.

जर्मनीमधील एका युवकाने १९९७ मध्ये त्याची गाडी एका इमारतीमध्ये पार्क करुन ठेवली होती. मात्र आपण ही गाडी कोठेतरी पार्क केली आहे याच गोष्टीचा त्याला पूर्णपणे विसर पडला होतो. एवढंच नाही तर आपली गाडी चोरीला गेली आहे असा समज करुन या व्यक्तीने पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर या गाडीची बरीच शोधाशोध झाली मात्र गाडी काही सापडली नाही.

दरम्यान, एका इमारतीमध्ये गेल्या २० वर्षापासून एक गाडी उभी होती. या गाडीचा मालक एकदाही न आल्याने गाडी पूर्णत: गंजून गेली होती. तिचा रंगही उडाला होता. याकारणामुळे स्थानिक प्रशासनाने ही गाडी भंगारात काढण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा गाडीच्या मालकाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर झालेल्या शोधाशोधीमध्ये २० वर्षानंतर या गाडीमालकाचा शोध लागला. मात्र ज्यावेळी या मालकाचा शोध लागला तेव्हा या मालकाचे वय ७६ असल्याचे उघड झाले. गाडी मालकाने २० वर्षापूर्वी ही गाडी याठिकाणी पार्क केली होती. त्याला या गोष्टीला पूर्णपणे विसरला पडला होता. आपली गाडी चोरीला गेल्याचा समज करून त्यानेही गाडी शोधण्याचा नाद सोडून दिला. परंतु या गाडीचा शोध तब्बल २० वर्षानंतर लागल्याचे समजताच गाडीमालकाला विशेष आनंद झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. गाडी पूर्णपणे गंजून गेल्यामुळे तिची विल्हेवाट लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने गाडी मालकाला नायलाजाने गाडीला भंगारात जाताना पहावे लागले. दरम्यान, गाडीमालकाच्या या विसरभोळेपणाची सर्वत्र चर्चा होऊन एकच हाशा पिकत आहे.