अनेक खेळाडूंची प्रेरणा असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका दिव्यांग मुलाचा प्रेरणादायी आणि भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सचिन तेंडुलकरसह नेटकऱ्यांच्या काळजालाच भिडला आहे. या मुलाचा खेळतानाचा व्हिडीओ ट्विटरवर खुद्द शेअर करत नव्या वर्षाची सुरूवात या प्रेरणादायी व्हिडीओपासून करा, असं आवाहन यावेळी सचिननं केलं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिव्यांग मुलाची जिद्द आणि चिकाटी दिसून येते. व्यवस्थित चालताही येत नसतानाही दिव्यांग मुलाने हाताच्या साह्याने पूर्ण केलेली धाव पाहून प्रत्येकजण अवाक होत आहे. दिव्यांग मुलाची ही जिद्द प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लहानमुले क्रिकेट खेळत आहेत. त्यामधील एक मुलगा दिव्यांग असून त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. पण त्याने चेंडू टोलवल्यानंतर हाताच्या साह्याने पूर्ण केलेली धाव कौतुकास्पद आहे.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहुन सचिन तेंडुलकर गहिवरला आहे. त्यानं हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलेय की, ”तुमच्या २०२० या नव्या वर्षाची सुरूवात या प्रेरणादायी व्हिडीओपासून करा. यामध्ये असलेला दिव्यांग मुलगा मड्डा राम आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत आहे. त्याची खेळण्याची जिद्द माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली. मला विश्वास आहे हा व्हिडीओ पाहून तुमचेही हृदयाला स्पर्श करेल.”