ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये मागील काही दिवसांपासून वणवे पेटले आहेत. २५ लाख हेक्टरचे वनश्रेत्राला या वणव्यांचा फटका बसला आहे. या वणव्यांमुळे वनसंपत्तीबरोबरच हजारो प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वन्यजीव संपत्तीमधील प्रमुख प्राणी असणाऱ्या कोआला प्रजातीलाही या वणव्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो कोआला आगीत जळून खाक झाले आहेत. तर अनेक जखमी प्राण्यांना वाचवण्यासाठी प्राणीमित्र संस्था, प्राण्यांचे डॉक्टर्स आणि स्वयंसेवक दिवसरात्र काम करत आहेत. मात्र या प्राण्यांना आगीमुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत. या प्राण्यांच्या बचावकार्याचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्याच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये आगीने भाजलेल्या कोआला प्राण्याला स्वयंसेवक पाणी पाजताना दिसत आहे.

बेल्लंग्री राज्यातील वनश्रेत्रामध्ये प्राण्यांचे बचावकार्य करणाऱ्या एका गटाला केट नावाचा कोआला प्राणी जखमी अवस्थेत अढळून आला. या कोआलाच्या अंगावर आगीच्या चटक्यांच्या खूणा दिसत होत्या. तहानेने व्याकूळ झालेल्या या कोआलाला स्वयंसेवकांनी पाणी पाजले. त्यानंतर या कोआलाला पोर्ट मॅकरी कोआला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण डिहायड्रेट झालेल्या या कोआलाला आणखीन पाणी प्यायचे असल्याने त्याला पुन्हा पाणी देण्यात आले. रुग्णालयाच्या फेसबुक पेजवरुन या कोआलाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. “या मादी कोआलाच्या पायांना, हाताला आणि चेहऱ्यावर आगीचे चटके बसल्याचे दिसून येत आहे,” असं म्हटलं आहे. सामान्यपणे सोने रंगाचे केस अंगावर असणारा कोआला हा प्राणी दिसायला खूपच आकर्षक असतो. मात्र या व्हिडिओत दिसणाऱ्या कोआलाच्या अंगावरील केस जळल्याचे दिसत आहे.

१४ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी मानवामुळेच पर्यावरणाची हानी होत असून आपल्या कृतीचे परिणाम या मुक्या प्राण्यांना सहन करावे लागत असल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.