लॉकडाउनमुळे सर्वांनाच आपापल्या घरी बंदिस्त व्हावं लागलं आहे. एरव्ही अनेकजण रेस्तराँमधील चमचमीत खाऊन  किंवा ऑनलाइन ऑर्डर देऊन जिभेचे चोचले पुरवतात. मात्र लॉकडाउनमध्ये बाहेरचे पदार्थ खाण्याचे सर्व पर्याय बंद झाले आहेत. अशावेळी घरीच स्वयंपाकाचे विविध प्रयोग केले जात आहेत. बाहेर मिळणारे पदार्थ घरी कसे बनवायचे हे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. भारतात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून गुगलवर सर्वाधिक रेसिपीज सर्च केल्या गेल्याचा अहवाल ‘गुगल’कडून जारी करण्यात आला आहे.

रेसिपीचे व्हिडीओसुद्धा सर्वाधिक पाहिले जात आहेत. सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीजची यादी गुगलने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘मोमो’ हा पदार्थ आहे. तरुणाईमध्ये या पदार्थाची फार क्रेझ पाहायला मिळते. मोमोज घरी कसे बनवायचे याची रेसिपी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली गेली. सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे.

लॉकडाउनमध्ये स्ट्रीट-फूडची सर्वांना जास्त आठवण येत आहे. म्हणूनच तिसऱ्या क्रमांकावर ‘पाणीपुरी’ हा पदार्थ आहे. चौथ्या क्रमांकावर असा पदार्थ आहे जो सहसा कोणी घरी बनवायला घेत नाही. कारण त्याची रेसिपी थोडी किचकट आहे. मिठाईच्या दुकानातूनच हा पदार्थ आणला जातो आणि त्याची गोड चव चाखली जाते. ही मिठाई आहे ‘जिलेबी’.

स्वयंपाक करण्यात मन रमून जातं आणि वेगवेगळ्या पदार्थांची चव घरीच चाखायला मिळते, म्हणून अनेकजण इंटरनेटच्या साहाय्याने रेसिपीज सर्च करून घरच्या घरीच बनवण्याची हौस पूर्ण करत आहेत.