नवीन वर्षात घरच्या मैदानावर न्यूझीलंडला भारताकडून टी-२० मालिकेत व्हाईटवॉश पत्करावा लागला. तिसरा आणि चौथा टी-२० सामना न्यूझीलंडने सुपरओव्हरमध्ये गमावला. मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू चेहऱ्याला गुलाबी रंग लावून मैदानात उतरले होते. सामन्यादरम्यान अनेकांना या गुलाबी रंगमागचं नेमकं रहस्य काय असेल असा प्रश्न पडला होता.

अनेकांनी न्यूझीलंडचे खेळाडू सनस्क्रीन लाऊन मैदानात उतरले आहेत असा अंदाजही बांधला. मात्र यामागचं खरं कारण हे वेगळचं होतं. काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियात महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडच्या महिला संघाला पाठींबा देण्यासाठी खेळाडू गुलाबी रंगात रंगून मैदानात उतरले होते.

२१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. अंतिम सामना हा ८ मार्चला म्हणजेच महिला दिनानिमीत्त मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडच्या महिलांचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी पर्थच्या मैदानावर श्रीलंकेच्या महिलांविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला टी-२० विश्वचषकाच्या माजी विजेत्या असून पहिल्याच दिवशी भारतीय महिलांविरुद्ध त्यांचा सामना रंगणार आहे.