22 July 2019

News Flash

..म्हणून स्टीफन हॉकिंग यांना नोबेल मिळाले नाही?

स्टीफन हॉकिंग यांचा आज पहिला स्मृतीदिन

स्टीफन हॉकिंग

प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं १४ मार्च २०१८ साली निधन झालं. आज त्यांचा पहिला स्मृतीदिन. मोटर न्यूरॉन डिसीज सारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संशोधनात व्यतीत केले. आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यानंतर विज्ञान आणि संशोधन पटलावर त्यांचं नाव आदरानं आजही घेतलं जातं. हॉकिंग यांनी सृष्टीची काही कोडी उलगडण्यात मोलाची भूमिका बजावली परंतु त्यांचा कधीही नोबेल पारितोषिकासाठी विचार झाला नाही, ही मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल.

कृष्णविवरांचाही (ब्लॅक होल्स) अंत होऊ शकतो या सर्वात मोठ्या संशोधनासाठीही त्यांना पारितोषिक मिळाले नाही. कृष्णविवरेही अमर्त्य नसून त्यांचाही शेवट होऊ शकतो हा त्यांचा सिद्धांत आता भौतिकशास्त्रात मान्यता पावलेला आहे. परंतु या सिद्धांताची खातरजमा करता येत नाही. तिची सत्यता पडताळता येत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे, तिची सत्यता मांडणीतून समजते परंतु प्रत्यक्षात पाहता येत नाही, ही अडचण असल्याचे टिमोथी फेरीस या विज्ञान अभ्यासक आणि लेखकाने म्हटले आहे.

ही कल्पना अजमावून बघण्याचा कोणताही उपाय नव्हता ही एक समस्याच आहे. कृष्ण विवरांचे आयुष्य इतके मोठे आहे की त्यांचा खरोखर मृत्यू होताना बघणे, ती संपताना बघणे हे कैक पिढ्यांसाठी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. फेरीस यांनी नमूद केले आहे की, जर कृष्ण विवरांचा मृत्यू होताना, त्यांचे अस्तित्व संपताना बघायला मिळाले असते, त्याची पडताळणी करता आली असती. मग हॉकिंगना नोबेल मिळालेही असते. फेरीस यांनी याबाबत नॅशनल जिऑग्रॉफिकमध्ये लिहिलेल्या लेखातून या द्रष्टय़ा संशोधकाला न लाभलेल्या नोबेल पारितोषिकाबद्दल माहिती दिली आहे.

कृष्ण विवरांचे आयुर्मान अब्जावधी वर्षे असल्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला त्याचे प्रत्यंतर येणे अशक्य आहे. याच कारणासाठी ‘हिग्ज बोसन’ची संकल्पना १९६४ मध्ये मांडणाऱ्या पीटर हिग्ज यांना अनेक दशके नोबेलने हुलकावणी दिली. ज्या वेळी हिग्ज बोसनची (देव कणाची) प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आणि हिग्ज यांचे संशोधन अनुभवाच्या कसोटीला उतरले त्या वेळी पीटर हिग्ज व फ्रान्सिस एंगलर्ट यांना २०१३ मध्ये संयुक्त नोबेल बहाल करण्यात आले. त्यामुळे महान संशोधन करूनही केवळ त्या संशोधनाच्या खातरजमेची व्याप्ती मानवी आवाक्याबाहेर म्हणजे अब्जावधी वर्षांची असल्यामुळे संशोधन पटूनही नोबेलने सन्मानित होता आले नाही, ही या संशोधकाबाबत दुरुस्त करता न येण्याजोगी गोष्ट आहे. नोबेल पारितोषिक मरणोत्तर दिले जात नसल्याने त्यांना आता ते मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

First Published on March 14, 2019 12:55 pm

Web Title: here why stephen hawking never won the nobel prize