अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या वंशवादी भूमिकेला कंटाळत आणि त्याचा निषेध म्हणून व्हाईट हाऊसच्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आपल्या नोकरीसाठी मुस्लिमांचा पारंपारिक हिजाब घालून येणाऱ्या रूमाना अहमद या मुस्लिम महिलेने तिच्या पदाचा राजीनामा दिलाय. जे सरकार आपल्या कट्टर विचारसरणीने आंधळं होत इतर धर्मीयांच्या विरोधात दरदिवशी गरळ ओकतं अशा सरकारमध्ये मी काम करू शकत नाही असं अहमद यांनी म्हटलं आहे.

२०११ साली म्हणजेच बराक ओबामा अध्यक्ष असताना रूमाना अहमद यानी व्हाईट हाऊसमध्ये नोकरी करायला सुरूवात केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची नेमणूक अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये करण्यात आली होती. अमेरिकन निवडणुकांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विखारी प्रचारादरम्यान या सगळ्या प्रकाराकडे रूमाना अहमद फार विषण्णतेने पाहत होत्या. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेतला विखार कमी करतील असं त्यांना वाटलं होतं. पण तीही अपेक्षा फोल ठरली आहे. अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात ट्रम्प यांनी मुस्लिम निर्वासितांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घातली. यावेळी रूमाना यांनी व्हाईट हाऊसमधली आपली नोकरी सोडण्याचा निर्णय पक्का केला.

त्या जेव्हा नोकरी आपली नोकरी सोडणार होत्या त्यावेळेस त्यांनी नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलच्या प्रमुखांची भेट घेतली. पण त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यापलीकडे या महाशयांनी काहीही केलं नाही. राजकीयदृष्ट्या कोणतंही अडचणीचं विधान करणं टाळत त्यांनी रूमाना अहमद यांचा राजीनामा स्वीकारला.

रूमाना अहमद यांचं कुटुंब मूळचं बांग्लादेशचं आहे. अमेरिकेत वर्णभेदी विचारसरणीने पुन्हा डोकं वर काढल्या आलेला मुस्लिमधर्मीय  व्हाईट हाऊस कर्मचाऱ्याचा राजीनामा हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेला बसलेला अलीकडच्या काळातला मोठा धक्का आहे.