फेसबुक किंवा अन्य एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG खेळता खेळता एक विवाहीत महिला एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा प्रकार समोर आलाय. इतकंच नाही तर त्याला भेटण्यासाठी या महिलेने थेट वाराणसी गाठलं होतं. पण नंतर तिने स्वतःच घरी फोन करुन परत घेऊन जाण्याची विनंती केली. आता पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवलं आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील ही घटना आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांगडामध्ये राहणारी एक विवाहीत महिला अचानक बेपत्ता झाली. महिलेचा पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. औषध आणायला जाते असं सांगून ती घराबाहेर पडली होती. नातलगांनी तिचा बराच शोध घेतला, पण ती काही भेटली नाही. अखेर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली व वाराणसीमधून तिला ताब्यात घेऊन कुटुंबियांकडे सोपवले. महिलेने बेपत्ता होण्यामागचं कारण सांगितल्यावर सर्वच हैराण झाले. तिला PUBG खेळण्याची आवड होती, खेळता-खेळता तिची वाराणसीच्या एका तरुणाशी ओळख झाली आणि थोड्याच दिवसांत ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर मोबाइलवर दोघांचं बोलणं सुरू झालं. थोड्यादिवसांनी त्याला भेटण्यासाठी या महिलेने थेट वाराणसी गाठलं. पण तिथे गेल्यावर संबंधित तरुण १२ वीचा विद्यार्थी असल्याचं तिला समजलं. त्यानंतर महिलेने स्वतःच आपल्या कुटुंबियांना फोन करुन परत घेऊन जाण्याची विनंती केली.