हिमाचल प्रदेशमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी ई-रजिस्ट्रेशन अनिवार्य केलं आहे. मात्र सरकारने लागू केलेली ही पद्धत सदोष असल्याची माहिती समोर येत आहे. कारण पोलिसांनीच आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ई-पास जारी केल्याची माहिती दिलीय. काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनीही या प्रकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केलाय.

दोन ईपासचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. या दोन्ही पासची वैधता सात मेपर्यंत आहे. चंदिगड ते शिमलामधील सुन्नीदरम्यानच्या प्रवासासाठी हा ई-पास जारी करण्यात आलाय. अत्यावश्यक सेवेअंतर्गत हा पास जारी करण्यात आलाय. या गाडीवरचा रजिस्ट्रीशन क्रमांक चंदिगडचा आहे.

दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावानेही पास जारी करण्यात आलाय. हा पास सुद्धा सात मेच्या प्रवासासाठी काढण्यात आला आहे. चंदिगडपासून शिमलापर्यंत जाण्यासाठी हा पास काढण्यात आलाय. विशेष म्हणजे यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजीव सैजल यांच्या घरी जाण्याचाही उल्लेख करण्यात आलाय. हा पास अत्यावश्यक सेवेअंतर्गत देण्यात आलाय. चंदिगडमधील गाडीसाठी हा पास देण्यात आला आहे. ट्रम्प यांच्याकडे मारुती ८०० तर अमिताभ यांच्याकडे बीट २०१० गाड्या असल्याचं सांगण्यात आलं असून या गाड्यांचे क्रमांक पास काढायला वापरण्यात आलेत.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची तयारी केली असून त्यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिलीय. शिमला पोलिसांसंदर्भातील ई-पास प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जात आहे. खोटा ई-पास बनवण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

या प्रकरणामुळे प्रशासनाने करोनावर निर्बंध घालण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांमधील गोंधळ नव्याने समोर आल्याची चर्चा राज्यामध्ये रंगलीय.