अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून प्रचंड विध्वंस आणि मृत्युतांडव घातला होता, त्या घटनेला आज ७४ वर्षे झाली आहेत. या हल्ल्यामध्ये तब्बल दोन लाखर जणांना आपला जीव गमावावा लागला होता. जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ, सेनानी यांनी विरोध केला होता. तरीही हा हल्ला का करण्यात आला होता.

अमेरिकन सरकारने हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून दोन लाख जपानी नागरिकांना ठार मारले. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात.

जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती.

महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली. दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला.

अण्वस्त्र हल्ल्यामुळे झालेल्या मृतांच्या संख्येच्या विविध अंदाजांपैकी मृतांचा कमीतकमी अंदाज असा आहे : हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. परंतु हिरोशिमा-नागासाकीमध्ये बहुसंख्य मृत्यू (९९%) निरपराध नागरिकांचे आहेत.