भारतात पहिला शिक्षक दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला. आता शिक्षक दिन याच दिवशी साजरा करण्यामागचे नेमके कारण काय तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भुषविले. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे स्थान कायम होते. त्यामुळे त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे खास सेलिब्रेशनच असते. विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवतातही. मग यादरम्यान झालेल्या गमतीजमती आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात. आई-वडिलांनंतर आपल्याला घडविण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या शिक्षकांचा असतो. त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान लक्षात रहावे यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ ही वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. १९५२ मध्ये ते भारतात परतले, त्यानंतर १९५२ ते १९६२ या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.