निवडणुकीच्या रिंगणात उतरताना द्वेषाचं राजकारण करू नका असा सल्ला देताना डिस्नेच्या सीईओंनी हिटलर सोशल मीडियाच्या प्रेमातच पडला असता असे सूचक उद्गार काढले आहेत. अमेरिकेमध्ये २०२० मध्ये निवडणुका होणार असून डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी या प्रचारादरम्यान द्वेषाला तिलांजली द्यावं असं आवाहन केलं आहे. जर हिटलरच्या काळात सोशल मीडिया असता तर असं विद्वेषाच्या प्रसारासाठी एक अत्यंत उपयुक्त माध्यम म्हणून तो सोशल मीडियाच्या प्रेमातच पडला असता असं बॉबनी ज्यू मानवाधिकार संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे.

“विद्वेष आणि संताप आपल्याला गर्तेत ढकलत आहेत. आपलं राजकारण तर विषेशत: अपमान करण्यावरच आधारलेलं आहे,” एका कार्यक्रमात बोलताना बॉब म्हणाले. “कट्टरतावाद्यांना आपला फुटीचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया साह्यकारी ठरतो त्यामुळे हिटलरला सोशल मीडिया आवडला असता. आत्मा हरवलेल्या व आधीच त्रास भोगत असलेल्या लोकांना बळी देण्यासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरतो,” त्यांनी सांगितलं.

इतरांची मानहानी करण्यावर भर न देणारा प्रचार बघायला मला आवडेल अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येकाचा समावेश करणारी भव्य दृष्टी बघायची आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले.