सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये केरळतील डाव्या पक्षाच्या सरकारने किनारपट्टी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या कोची शहरातील चार उंच इमारती स्फोटकांच्या साहाय्याने काही सेकंदात जमीनदोस्त केल्या. या इमारती पाडताना व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

कोची शहरातील मराडू येथे समुद्रकिनारी आलिशान उंच इमारती उभारण्यात आल्या होत्या. किनारपट्टी नियंत्रण रेषेचे (सीआरझेड) उल्लंघन करून या इमारती उभारण्यात आल्या होत्या. वास्तविक पालिकेने त्यांना परवानग्या दिल्या होत्या, पण सीआरझेडची मान्यता घेण्यात आली नव्हती. गेली दहा वर्षे या इमारतींचा वाद न्यायालयात सुरू होता. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या चार इमारती १३८ दिवसांमध्ये तोडण्याचा आदेश दिला होता. १९ मजल्यांच्या या चार इमारतींमध्ये ३२५ सदनिका होत्या. सदनिकाधारकांना २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई तात्काळ देण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिला होता. २००६ साली अनेकांनी ५० लाखांहून अधिक किंमतीला या सदनिका विकत घेतल्या होत्या. या चारही इमारती दोन दिवसांमध्ये काही सेकंदांमध्ये स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केरळ सरकारने आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता पावले उचलली होती.

व्हायरल झाला व्हिडिओ

काही सेकंदांमध्ये नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने कोची शहरातील मराडू सुमद्रकिनाऱ्याजवळील इमारती जमीनदोस्त झाल्या. हाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

केरळमधील या कारवाईनंतर महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकामांवरही अशापद्धतीची कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी वा भाजप-शिवसेना युतीचे सरकार असो, अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील न्यायालयांचे आदेश वेळोवेळी धाब्यावरच बसविण्यात आल्याचा आरोप अनेकदा केला जातो. आता केरळ सरकारच्या या कारवाईनंतर महाराष्ट्र सरकारही अशा पद्धतीने कारवाई करते का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.