केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कोच्चीमधील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही व्यक्ती शिवदासन नावाने स्थानिकांमध्ये लोकप्रिय होती. या समुद्रकिनाऱ्यावर बसवण्यात आलेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अर्धाकृती पुतळ्याची देखरेख करण्याचं काम शिवदासन करायचे. मात्र १६ डिसेंबर रोजी त्यांचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला. आधी शिवदासन यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र पोलिसांना त्यांच्या मृतदेहावर हत्याराने केलेला वार दिसल्यानंतर ६३ वर्षीय शिवदासन यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. याच शंकेच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी तपास केल्यानंतर शिवदासन यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमागील कारण आहे. कलाम यांच्या पुतळ्याची देखभाल करताना त्याची स्वच्छता करणं आणि फुलं वाहण्याचं काम करणाऱ्या शिवदासन यांना लोकप्रियता मिळाली. मात्र याच लोकप्रियतेमुळे नाराज असल्याने एका व्यक्तीने शिवदासन यांची हत्या केली.

शिवदासन हे मूळचे कोल्लम जिल्ह्याचे रहिवाशी होती. ते अनेक वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधा निमित्त कोच्चीमध्ये आले. इथे त्यांनी सुतारकाम करण्यास सुरुवात केली. मात्र ते कोच्चीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथवर रहायचे. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये ते त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या कामामुळे प्रचंड लोकप्रिय होते. शिवदासन हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे फार मोठे चाहते होते. शिवदासन हे केरळमध्ये दोनदा कलाम यांना भेटलेही होते. मध्यंतरी त्यांना कोच्ची येथील मरीन ड्राइव्हवर कलाम यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर धूळ बसल्याचं दिसलं. या पुतळ्याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचंही त्यांना जाणवलं. त्यामुळेच त्यांनी या पुतळ्याची साफसफाई केली आणि जवळच असणाऱ्या एका झाडाची फुलं या पुतळ्याला वाहिली. त्यानंतर शिवदासन रोज न चूकता हे काम करु लागले. मागील तीन वर्षांपासून ते हे काम रोज न चुकता करायचे.

शिवदासन यांच्या या कामाचे फोटो, व्हिडीओ आणि बातमी स्थानिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. शिवदासन यांची लोकप्रियता वाढू लागली तशी लोकं त्यांना शोधत या समुद्रकिनारी येऊ लगाली. अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. काहींनी तर त्यांच्या निवाऱ्याचीही व्यवस्था केली. मात्र शिवदासन यांना मिळणारी ही लोकप्रियता रस्त्यावर राहणाऱ्या काहीजणांच्या डोळ्यात खूपू लागली. त्यामधूनच राजेश नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने शिवदासन यांची हत्या केली. राजेशने शिवदासन यांच्याकडे पैशाची मागणी केली. शिवदासन यांच्याकडे दारुच्या नशेत पैशाची मागणी केल्यानंतर शिवदासन यांनी राजेशला नकार दिला. मात्र त्यावरुन झालेल्या वादामध्ये रागाच्या भरात राजेशने शिवदासन यांची हत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये राजेशला अटक केल्यानंतर आपल्याला शिवदासन यांना मिळालेली लोकप्रियता फारशी आवडलेली नव्हती असं सांगितलं आहे. सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये शिवदासन यांना मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहून भांडणाच्या निमित्ताने रागाच्या भरात मी त्यांची हत्या केली असा जबाब राजेशने पोलिसांना दिला आहे.