सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे एका विवाहीत महिलेला चांगलेच महाग पडले आहे. या महिलेला मोठा फटका बसला आहे. आरोपीने सोशल मीडियावरुन या महिलेबरोबर मैत्री केली होती. फसवणूक झालेली महिला बंगळुरुच्या भारतीनगर भागामध्ये राहते. सदर महिलेचा पती बिझनेसमॅन आहे. आरोपीने तो लंडन येथे राहायला असून त्याचे नाव डॅनियल सांगितले होते.

नेमकं काय घडलं?
२५ नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत आरोपीने ६२ हजार पाऊंडची ज्वेलरी गिफ्ट करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केली. फसवणूक झालेली महिला गृहिणी असून डॅनियलने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडयात तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. “चॅटिंग सुरु झाल्यानंतर आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आम्ही दोघांनी परस्परांना आमचे फोन नंबरही दिले. काही दिवसांनी डॅनियलने ६२ हजार पाऊंडसची ज्वेलरी गिफ्ट म्हणून एका कंपनीमार्फत पाठवत असल्याचे सांगितले.”

“दोन दिवसांनी एका व्यक्तीचा मला फोन आला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कस्टम अधिकारी  म्हणून बोलत असल्याचे त्याने सांगितले. विमानतळावर माझा गिफ्टचा बॉक्स आला असून तो बाहेर काढण्यासाठी ५५ हजार रुपये भरावे लागतील असे त्याने सांगितले. मी माझ्या नवऱ्याच्या खात्यातून ते पैसे ट्रान्सफर केले. मला कस्टम अधिकाऱ्याची सही आणि शिक्का असलेली पोचपावती देखील मिळाली” असे महिला म्हणाली.

“दोन दिवसांनी मला डॅनियलचा फोन आला. त्याने महिलेला वेगवेगळया खात्यांमध्ये दोन लाख २५ हजार डिपॉझिट करण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन मी पैसे डिपॉझिट केले. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने बॉक्सचे वजन १७ किलो असून कस्टमकडून बॉक्स क्लिअर करण्यासाठी आणखी साडेपाच लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. मी पुन्हा पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा मला फोन आला. कुरीयरमार्फत गिफ्ट मिळेल त्यासाठी मला १२ लाख भरायला सांगितले”.

माझ्या नवऱ्याला आणि कुटुंबियांना त्या व्यक्तीवर संशय आल्यानंतर मी त्याला त्याच्याबद्दल आणखी विचारु लागले तेव्हा त्याने कॉल कट केला असे महिलेने पोलिसांना सांगितले. कॉल कट केल्यानंतर डॅनियल इन्स्टाग्रामवरुन गायब झाला व आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. संबंधित महिलेला १० दिवसात ११ लाख रुपयांना फसवलं.