स्मार्टफोन हरवणं यामध्ये कोणतीही नवी गोष्ट नाहीये, कारण रोज कोणाचा ना कोणाचा स्मार्टफोन हरवत असतोच. पण मोबाइल निर्मात्या कंपनीचा प्रोटोटाइप फोनच हरवला तर…हो हे खरंय…Honor कंपनीबाबत नुकतीच ही घटना घडलीये.

कोणतीही मोबाइल कंपनी स्मार्टफोन बनवण्याआधी त्या संकल्पनेचं पहिलं साकार स्वरूप म्हणजे प्रोटोटाइप बनवते. एकदा प्रोटोटाइप बनवून झाल्यानंतर त्याप्रमाणेच इतर मॉडेल्स बनवली जातात. पण ऑनर या कंपनीचा नवीन लाँच होणारा प्रोटोटाइप फोन जर्मनीत हरवल्याची बातमी समोर येतेय. हा मोबाइल परत आणून देणाऱ्यास 5000 युरो म्हणजेच जवळपास 4 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

एका ट्रेनमध्ये हा प्रोटोटाइप फोन हरवल्याची माहिती आहे. 22 एप्रिल रोजी जर्मनीतील डसलडॉर्फकडून म्यूनिकला जाणाऱ्या ICE 1125 या ट्रेनमध्ये एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे फोन हरवल्याचं समजतंय. कंपनीकडून ट्विटरद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच हरवलेला फोन परत आणून देण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.

उल्लेखनीय म्हणजे ऑनर कंपनीने आपल्या Honor 20 सीरीज मधील नवा फोन 21 मे रोजी लंडन मध्ये लाँच करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे हरवलेला प्रोटोटाइप फोन हा याच सिरीज मधला एक फोन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 मेपर्यंत जर हा फोन सापडला नाही तर कदाचीत कंपनी या फोनचा शोध देखील थांबवेल असं म्हटलं जात आहे. पण अद्याप कंपनीकडे बराच वेळ आहे, त्यामुळेच प्रोटोटाइप स्मार्टफोन परत मिळवण्यासाठी कंपनीकडून इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने हरवलेल्या प्रोटोटाइपवर एवढे मोठे बक्षीस जाहीर केले आहे यावरून हे स्पष्ट आहे की कंपनीला फोन लीक होऊ द्यायचा नाहीये, कारण जर हा प्रोटोटाइप इतर कंपन्यांच्या हाती लागला तर यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, याबाबत सहज माहिती मिळू शकते. याउलट इतर मोबाइल कंपन्या मात्र हा प्रोटोटाइप मिळवण्यासाठी बक्षिसाच्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम देण्याची शक्यता नाकारता येत नाही.