सध्या संपूर्ण जगाला करोना विषाणूने ग्रासलं आहे. अनेक विकसीत देशांसह विकसनशील देशही या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. भारताचा पारंपरिक शेजारी म्हणून ओळख असलेला पाकिस्तानही या विषाणूशी सामना करतो आहे. सध्याच्या खडतर काळात अनेक सेलिब्रेटी, खेळाडू पुढे येऊन गोर-गरीबांना अन्नदान करत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून पाकिस्तानातील गरिब व गरजू जनतेला अन्नदान करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

काही दिवसांपूर्वी युवराज सिंह व हरभजन सिंह या दोन भारतीय खेळाडूंनीही आफ्रिदीला पाठींबा दर्शवला होता. पण यानंतर त्याला टीका सहन करावी लागली. पाकिस्तानात हिंदू व्यक्तींना अन्नधान्य दिलं जात नसल्याच्या बातम्याही मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र संकटकाळात माणुसकी हाच एक धर्म असतो हे आफ्रिदीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पाकिस्तानातील श्री लक्ष्मी नारायण मंदीरात जाऊन आफ्रिदीने गरजू व गरिब व्यक्तींना अन्नदान केलं आहे. या मदतकार्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. सध्या सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. काही दिवसांपूर्वी माजी पाक गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवण्याची मागणी केली होती, ज्याला आफ्रिदीनेही पाठींबा दर्शवला होता.