पाकिस्तानमधील कराची येथील प्राणीसंग्रहालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काम करणारा एक कर्मचारी सिंहाच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. सिंहांच्या पिंजऱ्यामध्ये मांस टाकत असताना एका सिंहाने या कर्मचाऱ्याचा हातच आपल्या जबड्यात पकडला आणि एकच गोंधळ उडाला. बऱ्याच प्रयत्नानंतर या कर्माचाऱ्याला सिंहाच्या जबड्यातून आपला हात सोडवण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कराची प्राणीसंग्रहालयामध्ये काम करणाऱ्या कानू पिरादित्ता या कर्मचाऱ्यावर सिंहाने हल्ला केला. सिंहांच्या पिंजऱ्यामध्ये कच्चे मांस टाकण्यासाठी कानूने पिंजऱ्यामध्ये हात टाकला होता. त्याच वेळी नेहमीप्रमाणे सिंह मांस खाण्यासाठी पिंजऱ्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजेच कानूजवळ आले. सिंह नेहमीप्रमाणे मांस खाईल असं कानूला वाटल्याने तो पिंजऱ्यामध्ये मांस टाकण्याचे काम करत होता. मात्र अचानक एका सिंहाने कानूचा डावा हातच आपल्या जबड्यात पकडला आणि तो हात खेचू लागला. त्यामुळे कानू जोरात ओरडला. सिंह जोरात हात ओढत असल्याने कानू पिंजऱ्याच्या जाळीवर आपटला जात होता. पिंजरा आणि पर्यटकांमध्ये असणाऱ्या संरक्षक कठड्यामुळे पर्यटकांनाही कानूची मदत करता आली नाही. काही वेळ हा संघर्ष सुरु राहिल्यानंतर अखेर सिंहाने कानूचा हात सोडला. कानू खाली पडला तेव्हा त्याचे शर्ट फाटले होते. कानूच्या डाव्या हाताच्या कोपराच्या वरच्या भागातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता. कानूला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. सध्या त्याची प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार कानू हा मागील पाच वर्षांपासून प्राणीसंग्रहालयामध्ये काम करत आहे. कराचीमधील या प्राणीसंग्रहालयाचे मालक असणाऱ्या अयुब यांनी कानूच्या उपचारांचा सर्व खर्च उचलणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच कानूने चुकीच्या पद्धतीने सिंहांना मांस देण्याचा प्रयत्न केल्याचेही प्राणीसंग्रहालयाच्या मालकांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले आहेत.