हात- पाय तुटलेल्या, डोळे निखळलेल्या, कपाटात बंद करून ठेवलेल्या या चित्रविचित्र बाहुल्या पाहून कोणाच्याही अंगावर भीतीनं काटा येईल. पण, हे दृश्य पाहून तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका, कारण हे दृश्य कोणा हाँटेड हाऊसमधलं नसून लिस्बनमधल्या बाहुल्यांच्या रुग्णालयातलं आहे.

जगातलं हे सर्वात विचित्र आणि सर्वात जुनं बाहुल्यांचं रुग्णालय आहे. हे रुग्णालय जवळपास १८८ वर्षे जुनं आहे आणि या रुग्णालयाच्या संस्थापकाची पाचवी पिढी येथे सध्या काम करत आहे. तुटलेल्या बाहुल्यांना दुरुस्त करण्याचं काम येथे केलं जातं. हात पाय मोडलेल्या, डोळा निखळलेल्या किंवा खराब झालेल्या असंख्य बाहुल्या ‘सर्जरी’साठी येथे येतात. आतापर्यंत हजारो बाहुल्यांची दुरुस्ती करण्यात आलीय. तर सध्या या रुग्णालयात ४ हजारांहून अधिक बाहुल्या आहेत. ‘हॉस्पिटल दी बोनेकस’ या नावानं हे रुग्णालय ओळखलं जातं. या रुग्णालयात ठिकठिकाणी बाहुल्याचे वेगवेगळे अवयव कपाटात बंद करुन ठेवले आहेत त्यामुळे एखादा नवखा या रुग्णालयात आला की समोर दिसणारं दृश्य पाहून त्याच्या अंगावर भीतीनं काटा आल्याशिवाय राहत नाही. सध्या येथे तीन महिला बाहुल्यांची सर्जरी करतात. अर्थात त्यांना डॉक्टर म्हणूनच ओळखलं जातं.

१८३० मध्ये हे रुग्णालय स्थापन करण्यात आलं. तेव्हापासून अनेक तुटलेल्या दुर्मिळ बाहुल्या येथे दुरुस्तीसाठी येत आहेत. प्रत्येक बाहुल्यांची स्वतंत्र्य अशी फाईल रुग्णालयात आहे त्यावर तिची एकूण एक माहिती लिहिलेली आहे.