पिंपरी- चिंचवडमधल्या भोसरीतील महापालिकेच्या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक गरम पाणी वाहू लागलं. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरताच ते पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली. आश्चर्य म्हणजे या खड्ड्यातून येणाऱ्या पाण्यात प्लॅस्टिकची बाटलीही काही सेकंदात सहज वितळल्यानं आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती आणि तितकचं कुतूहलदेखील होतं. पिंपरी-चिंचवडमधील्या महापालिकेच्या सहल केंद्रात घडलेली ही घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. थंडीच्या दिवसात खड्ड्यातून गरम पाणी येऊ लागल्यानं आजूबाजूच्या परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र यामागचं सत्य आता समोर आलं आहे. जमीनीतून गरम पाण्याचा झरा येण्यामागे नैसर्गिक चमत्कार नसून ‘थ्री फेज’ वायरमुळे पाणी गरम झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील्या महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यातून गरम पाणी येऊ लागलं. या पाण्याचं तापमान अधिक असल्यानं प्लॅस्टिकच्या बाटल्याही काही सेकंदात वितळत असल्याचे स्थानिकांनी लक्षात आणून दिले. एका स्थानिकानं ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजल्यापासून खड्ड्यातून उकळतं पाणी यायला सुरूवात झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या ठिकाणी मात्र पाण्याचं तापमान हे सर्वसामान्य होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ‘थ्री फेज’ वायरमुळे हा प्रकार घडल्याचं लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांची भीती कमी झाली आहे.  मात्र गेल्या चार वर्षांपासून ही वायर बंद आहे, ती गार्डनच्या विजेसाठी वापरली जात होती. त्यामुळे ‘थ्री फेज’ वायरमुळे हे झालं नसावं असं पालिकेचे कर्मचारी अशोक दत्तात्रेय नाईक यांचं म्हणणं आहे.