तुम्ही बाहेरगावी आहात. तुमच्याकडचे पैसे संपलेत. कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण शहरात ओळखीचं कोणीच नाही. पोटात जबरदस्त भूक आणि रस्ते ओस पडलेत.

अशा वेळी कोणी जर गरमागरम सूपचा कप आपल्यासमोर ठेवला तर? त्यासोबत जेवणाचीही सोय पैसे न घेता झाली तर? त्याहीपुढे जात या लोकांनी त्या शहरातल्या गरजूंसाठी काय अशी व्यवस्था केली तर?

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या हाॅटेलमध्ये ही सगळी सोय दर दिवशी झाली तर?

विश्वास बसणार नाही पण अशा पध्दतीचं एक हाॅटेल अस्तित्वात आहे. स्पेनमध्ये हे हाॅटेल सुरू आहे. या हाॅटेलमध्ये गरजूंच्या जेवणाची सोय केली जाते. तेही कोणतेही पैसे न घेता. या हाॅटेलचं नावही तसंच आहे ‘राॅबिनहूड हाॅटेल’.

राॅबिनहूड जसा गरिबांची मदत करायचा तसंच हे हाॅटेल गरजूंच्या जेवणाची सोय करतं. पण गरिबांकडून कुठलेही पैसे न घेता त्यांना जेवण देणाऱ्या या हाॅटेलचा खर्च चालतो तरी कसा?

आपला खर्च भागवायला राॅबिन हूड हाॅटेल राॅबिन हूडचीच पध्दत वापरतं. फरक इतकाच की मूळचा राॅबिन हूड श्रीमंतांना लुटायचा, पण हे हाॅटेल मात्र ज्यांची जेवणाचं बिल देण्याची एेपत आहे त्यांना बिल देण्याची विनंती करतं आणि ते पैसे गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वापरले जातात.

या परिसरातल्या चर्चमधल्या फादर आंगेल यांनी हे हाॅटेल सुरू केलंय. इंग्लिशमधल्या ‘एंजल’ या शब्दाचं ‘आंगेल’ हे स्पॅनिश रूप आहे.

वाचा- अशिक्षित असूनही ६० वर्षांच्या वृद्धाने झोपडीत सुरु केले ग्रंथालय

स्पेनची अर्थव्यवस्था आता मंदीच्या विळख्यातून काहीशी बाहेर पडली असली तरी जनता अजूनही त्यातून सावरते आहे. पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या व्यवसाय करणारे आणि आपल्या हाताखालच्या शेकडो माणसांना पगार देणारे कितीतरी लोक मंदीच्या विळख्यात सापडून बेरोजगार झाले. या सगळ्यांसाठी राॅबिनहूड हाॅटेल एक मोठा आधार ठरलंय.

आपल्या या वेगळ्याच बिझनेस माॅडेलमुळे राॅबिन हूड हाॅटेल फेमस झालंय. या हाॅटेलच्या किचनमध्ये आता अनेक सेलेब्रिटी शेफ्स येऊन जेवण बनवून जातात. यासाठी ते कुठलंही मानधन घेत नाहीत. या हाॅटेलमध्ये येऊन लोकांना जेवण वाढण्यासाठीही अनेक स्वयंसेवक पुढे येतात. तसंच या हाॅटेलची आर्थिक बाजू चांगली राहावी यासाठी अनेक श्रीमंत व्यक्ती मुद्दाम .या हाॅटेलमध्ये येऊन जेवण करत बिलाच्या रूपात आर्थिक साहाय्य करत असतात.

वाचा- भारतीय वंशाच्या मुलीला ओबामांनी लिहिले पत्र

डिसेंबर महिन्यात राॅबिनहूड हाॅटेल सुरू करणारे फादर आंगेल हे या हाॅटेलच्या परिसरात साहजिकच लोकप्रिय झालेत. ते ज्या चर्चचे आहेत त्या चर्चमध्येही त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. माद्रिदमधलं हे एकच चर्च असं आहे जे दिवसाचे २४ तास चालू असतं. ज्यांच्याकडे टीव्ही नाही अशांना आसपासच्या घडामोडी कळाव्यात यासाठी फादर आंगेल यांनी त्यांच्या चर्चमध्ये टीव्हीसुध्दा बसवला आहे.

दर दिवशी १०० गरजू व्यक्तींच्या जेवणाची सोय करणारं हाॅटेल राॅबिनहूड हा माद्रिदमधला एक वेगळाच प्रयोग ठरला आहे.