महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटवर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. या माध्यमातून मिळालेल्या सुचना आणि सल्ले अनेकदा ते गांभीर्याने घेतात. त्यामुळेच अनेकजण त्यांना वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये टॅग करुन भन्नाट गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यापैकी काही ट्विट आनंद महिंद्रा रिट्विट करत त्यावर भाष्य करतात. असाच एक व्हिडिओ त्यांना नुकताच ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये कमी जागेत पार्किंग करणाऱ्या भारतीयांनी केलेला एक भन्नाट जुगाड दाखवण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

रोहित अग्रवाल या व्यक्तीने “भारतीयांच्या हुशारीला मर्यादा नाही,” अशा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका गल्लीएवढ्या आकाराच्या प्रवेशद्वारामधून चार चाकी गाडी येताना दिसते. ही गाडी पार्क करण्यासाठी चक्क एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याचे दिसते. गाडी आतमध्ये येण्याआधी लोखंडाचा हा प्लॅटफॉर्म बाहेर काढला जातो. या प्लॅटफॉर्मला खालून चाकं बसवण्यात आली आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या या लोखंडी जाळीसारख्या दिसणाऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी चढवली जाते. त्यानंतर गाडीला धक्का देत गॅजेरमध्ये ढकलली जाते. या लोखंडी प्लॅटफॉर्ममुळे गाडी पार्क करताना सतत तिला पुढे मागे घेत अंदाज घेण्याची गरज पडत नाही आणि कमी जागेत गाडी पार्क करता येते.

आनंद महिंद्रा काय म्हणतात?

महिंद्रांनी हे ट्विट कोट करुन रिट्विट केलं आहे. “जेव्हा तुमच्याकडे हलचाल करण्यासाठी कमी जागा असेल अशावेळेस काय करावं? मर्यादा असताना त्यावर भन्नाट उत्तर शोधून काढण्याचे कौशल्य भारतीयांकडे आहे यात शंकाच नाही,” असं महिंद्रांनी हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटलं आहे.

महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी जुगाड करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नाही असं मत व्यक्त केलं आहे.