समाजमाध्यमांचा वापर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे वेळोवेळी समोर येते. सध्या एका व्हिडीओचा अशाच प्रकारे जातींमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी वापर केला जात आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये घरावर भगवा झेंडा फडकवण्यावरून हिंदू तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली,’ अशा संदेशासह पसरवण्यात येत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरुणाला झाडाला बांधून जमाव बेदम मारहाण करत असल्याचे दिसते. ही मारहाण पाहून अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही आणि भावनेच्या भरात हा व्हिडीओ लगेच ‘फॉरवर्ड’ही केला जात आहे. मात्र, त्यापूर्वी खातरजमा करण्याची तसदी कुणी घेत नाही. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत.

प्रत्यक्षात हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील असून युवकाचे नाव शमशाद अहमद असे आहे. त्यामुळे ‘हिंदू तरुणाला पश्चिम बंगालमध्ये मारहाण’ हा पहिला दावाच खोटा पडतो. ही मारहाण आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शमशादने नासिर अन्सारी याला दिलेले पैसे परत मागितल्यानंतर त्याला नासिर व त्याच्या मित्रांनी अमानुष मारहाण केली होती. ही घटना मार्च महिन्यातली आहे. याबाबतच्या बातम्या स्थानिक दैनिकांसह काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरूनही प्रसारित करण्यात आल्या. मात्र, ते सत्य बाजूला सारत समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी या व्हिडीओचा वापर सुरू केला आहे.