खाकीतल्या माणसांच्या अनेक गोष्टी दररोज कानावर येत असतात. चांगल्या वाईट अशा दोन्हींही. पण, खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात घडली आहे. जन्मदात्यांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या नवजात तान्हुलीला पोलिसांच्या प्रयत्नांमुळे नवा जन्म मिळाला आहे.

नागपूरमधील मनीष नगरमध्ये नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीला आईवडिलांनी रस्त्यावर असलेल्या एका चारचाकी गाडीला टाकून दिले होते. ही बाब पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक मंसाराम वंजारी आणि आशिष लक्षणे यांना कळाली. त्यांनी कर्तव्य तत्परता दाखवत त्या चिमुकलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे जन्माच्या काही तासांतच या कोवळ्या कळीला दुसऱ्यांदा जन्म मिळाला आहे.

पोलिसांनी ही घटना ट्विटरवरून शेअर केली आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. या कामाबद्दल पोलिसांचे अभिनंदन. त्याचबरोबर पोलिसांनी त्या मुलीच्या आईवडिलांना शोधून काढले पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे, असेही काहीजणांनी म्हटले आहे. तर एकाने या मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझे पाच जणांचे कुटुंब आहे. मी, आई-वडील, पत्नी आणि दहा वर्षांचा मुलगा, असे माझे कुटुंब आहे. मी या मुलीला दत्तक घेऊ शकतो का, अशी विचारणा एकाने केली आहे.