जगभरातील विविध देशांनी नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई करुन सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. इटलीमध्येही नवीन वर्षाच्या स्वागतचा उत्साह पाहायला मिळाला. पण यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.

इटलीची राजधानी रोममध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. पण यामुळे शेकडो पक्षी मरून पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजधानी रोमच्या रस्त्यावर अनेक मृत पक्ष्यांचा खच पडल्याचं दिसतंय. इटलीतील प्राणी-पक्षी अधिकार संरक्षण कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे एकप्रकारचं ‘हत्याकांड’ असल्याचं म्हटलं आहे.

अचानक इतक्या पक्ष्यांच्या झालेल्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संघटनेने, मध्यरात्री अचानक झालेल्या फटाक्यांच्या कर्कश्य आवाजाने पक्षी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी उडण्याचा प्रयत्न केला असावा पण अंधारात घरांच्या खिडक्यांना ठोकल्याने किंवा उडताना एकमेकांना धडकल्याने आणि उच्च व्होल्टेज विद्युत केबल्समध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. जीव जाण्याच्या भीतीने घाबरल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झालेला असू शकतो, किंवा हृदयविकाराचा झटका आल्यामुळेही पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो, असं संघटनेच्या प्रवक्त्या लोरिडेना डिग्लीओ (Loredana Diglio) यांनी सांगितलं. फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक वन्य आणि पाळीव प्राणी जखमी होत असतात, असंही डिग्लीओ यांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे रोममध्ये फटाके फोडण्यावर बंदी आहे, त्यातच करोनामुळे रात्री 10 नंतर बाहेर फिरण्यास नियमावली घातलेली असतानाही नागरिकांनी दुर्लक्ष केलं आणि नववर्षाचं फटाके फोडून स्वागत केलं. बघा व्हिडिओ :-

दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांमुळे शेकडो पक्ष्यांचा जीव गेल्याने प्राणी प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.