अनेकदा छुप्या कॅमेरामध्ये प्राण्यांच्या भन्नाट हलचाली कैद होतात. मग अगदी ऑस्ट्रेलियामध्ये काही आठवड्यांपूर्वी लागलेल्या वणव्यांच्या काळात कोल्ह्याने कोआलाच्या पिल्लांना दुग्धपान करणं असो किंवा कोळ्याने गोल्डफीशची शिकार करणे असो. छुप्या कामेरांमुळे कधीही न कैद झालेल्या घटना कॅमेरात कैद झाल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये झोपलेल्या मगरीच्या तोंडातून बिबट्या मांसाचा तुकडा काढून घेताना दिसतो. वन्यजीवासंदर्भातील चित्रपट निर्माता असलेल्या निकोलने हा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या दबक्या पावलांनी मगरीजवळ येतो.  मगरीच्या तोंडातील मांसाचा मोठा तुकडा बिबट्या आपल्या जबड्यामध्ये पकडतो. मगर डोळे बंद करुन निपचित पडलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा बिबट्या मांसांचा तुकडा मगरीच्या जबड्यातून बाहेर काढून घेताना अचानक मगर डोळे उघडते.

मगर जबडा बंद करण्याच्या आतच बिबट्या तिच्या तोंडातील मांस घेऊन तेथून पळ काढतो. पुन्हा तो बिबट्या मगरी जवळ येतो तेव्हा मगरच तिथून पळ काढताना दिसते. झांबियामधील एका नदी किनारी असणार्या एमफ्यूवे लॉज येथे निकोलने हा व्हिडिओ शूट केला आहे.

“तो बिबट्या अगदी त्या मगरीच्या तोंडामध्ये घुसला होता. मात्र तो खूपच सावध होता. ती मगर पूर्णपणे झोपली नव्हती. तिने अचानक आपले डोळे उघडले. पण बिबट्याला वेळीच पळून जाण्यात यश आहे. निसर्ग किती क्रूर आहे आणि इथे टिकून राहण्यासाठी काय काय करावं लागतं हेच या व्हिडिओमधून दिसून येत,” असं या अनुभवाबद्दल बोलताना निकोल बोलताना सांगते.

“मला बिबट्या पकडला जाईल अशी भिती वाटत होती. मात्र आपण काय करत आहोत याची प्राण्यांना पूर्णपणे कल्पना असते,” असं निकोलने या व्हिडिओबद्दल डेली मेलशी बोलताना सांगितलं.