पती आणि पत्नीमधलं नात हे खूप नाजूक असतं. अनेक वर्ष एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचं क्षुल्लक गोष्टींवरुन भांडण होतं आणि दोघं वेगळी होतात…अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र मध्य प्रदेशातील देवास भागात पती आणि पत्नीच्या भांडणाला कारण ठरली आहे शेवेची भाजी….पत्नीने शेवेची भाजी केली नाही म्हणून रागावलेल्या पतीने घर सोडून तब्बल १७ वर्ष अबोला धरला. अखेरीस न्यायालयासमोर हे प्रकरण आल्यानंतर, न्यायाधीशांनी शक्कल लढवत या प्रकरणात समेट घडवून आणली.

न्यायाधीशांनी अखेरीस दोघांमध्ये तह घडवून आणला

 

मध्य प्रदेशातील देवास भागात राहणाऱ्या विमलराव यांनी बँकेच्या नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा विमलरावांनी आपल्या पत्नीच्या हाती सोपवला. इतकच नव्हे तर देवासमधलं राहतं घर आणि आपलं पेन्शनही विमलरावांनी बायकोच्या खात्यात जमा केलं. एक दिवस विमलरावांना शेवेची भाजी खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या पत्नीला शेवेची भाजी बनवण्यास सांगितल्यानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यामुळे रागावलेल्या विमलराव यांनी पत्नीला न सांगता आपलं देवासमधलं राहतं घर सोडलं.

राहतं घर सोडल्यानंतर विमलराव महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यातील मातोड गावात झोपडी बांधून राहु लागले. काही कालावधीनंतर विमलरावांनी पेन्शनही आपल्या खात्यात वर्ग करुन घेतलं. यानंतर हा मुद्दा कोर्टात गेला. जी पत्नी मला शेवेची भाजी देऊ शकत नाही, तिला मी पैसे का द्यायचे असा सवाल विचारत विमलरावांनी कोर्टात आपली नाराजी बोलून दाखवली. पत्नी तर साईबाबांसमोर शपथ घेणार असेल तर मी समेट करायला तयार असल्याचं विमलरावांनी सांगितलं. यानंतर न्यायाधीश गंगाचरण दुबे यांनी स्वतः पुढाकार घेत शेव आणायला सांगत, पत्नीला भाजी करुन देण्याचे आदेश दिले. इतकच नव्हे तर दोघांनाही शिर्डीला जाण्यासाठी दीड हजार रुपयांची सोय करुन देत न्यायाधीशांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला.