संसार म्हटले की भांडणे ही होणारच त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी संसारात छोट्या मोठ्या गोष्टींवरून खटके हे उडतातच. मग एकमेकांवर रागवणे, बोलणे टाळणे असे प्रकारही नेहमीचेच पण राजस्थानमधल्या एका पतीने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर असा काही प्रताप केला की गावासोबत पोलिसांना देखील यावे लागले. भांडणानंतर रुसून घर सोडून गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी नव-याने चक्क शोले स्टाईल स्टंट केला.
राजस्थानमधल्या टिब्बी गावात राहणा-या राजू कुमार याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले. त्यामुळे आपला राग शांत करण्यासाठी त्याची पत्नी घरातून निघून गेली. ती शेजा-यांच्या घरात बसली होती पण राजूला मात्र त्याची कल्पना नव्हती, त्यामुळे तिच्यावर राग काढण्यासाठी घरासमोरच्या उंच झाडावर चढून त्याने तमाशा करायला सुरूवात केली. आपली पत्नी पळून गेली असा कांगावा त्याने केला. त्याच्या आराड्याओरड्याने सारा गाव गोळा झाला. पण त्याची पत्नी मात्र शेजारच्या घरात बसली होती. तासभर तरी त्याचा तमाशा सुरू होता. अखेर गावक-यांनी पोलिसांना बोलावून आणले नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 1:26 pm