पबजी या ऑनलाइन गेमने जगभरातील तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. पबजी या ऑनलाइन गेममुळे होणारे दुष्परिणाम माहिती असूनही त्याचं वेड काही कमी होताना दिसत नाही आहे. पबजी या गेमने भारतातील तरुणाईलाही आपल्या जाळ्यात ओढलं असून मुलं आणि तरुण तासनतास यामध्ये गुंतलेले असतात. अशातच एका तरुणाने पबजी गेमसाठी आपल्या गरोदर पत्नीला सोडून दिल्याचं समोर आलं आहे. हा तरुण मलेशियन वंशाचा असून यासंबंधीची पोस्ट फेसबुकवर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पतीला त्याच्या भावांनी पबजी गेमची ओळख करुन दिली होती. यानंतर पतीला पबजीचं वेड लागलं होतं. रात्रभर जागून तो पबजी गेम खेळू लागला होता ज्यामुळे दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती. पती आपल्या कुटुंबाकडे आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करु लागला होता.

यानंतर पतीने कुटुंब आणि पबजीपैकी एकाची निवड करण्याचं ठरवलं. आपण पबजीपासून दूर राहू शकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर घर सोडून जाण्याचा निर्णय त्याने घेतला. पती घऱ सोडून जाऊन महिना झाल्याचं पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. पबजी गेम खेळत नव्हता तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. पण नंतर त्याच्यात बदल होत गेला अशी माहिती पत्नीने दिली आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी ११ वर्षाच्या मुलाने राज्य सरकारला पत्र लिहून पबजी या ऑनलाइन गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. आहाद असं या मुलाचं नाव आहे. आहादने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने पबजी गेम हिंसेला खतपाणी घालत असल्याचं सांगत बंदी आणण्याची मागणी केली आहे.

‘पबजी’चा हट्ट, मुंबईत तरुणाची आत्महत्या

पबजी खेळण्यासाठी नवीन मोबाइल घेऊन न दिल्याने मुंबईतील एका 19 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली. नदीम शेख (19)असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे.

नदीम शेख हा कुर्ल्यातील नेहरु नगर परिसरात त्याची आई, भाऊ आणि भावाची पत्नी व भावाच्या मुलीसह वास्तव्यास होता. नदीम हा त्याच्या भावाकडे महागडा मोबाइल मागत होता. त्यासाठी नदीम शेखने भावाकडे 37 हजार रुपयांची मागणी केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि अखेर भावाने त्याला 20 हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली. पण मला पूर्ण रक्कम हवी व तोच मोबाइल हवाय असा हट्ट धरत नदीमने ते पैसे नाकारले.

या घटनेनंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास कुटुंबीय झोपायला गेले पण नदीम गेम खेळत होता. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ शौचालयाला जाण्यासाठी उठला असता किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून नदीमने आत्महत्या केल्याचं त्याला दिसलं.