टॅक्सीने प्रवास करणा-या प्रवाशांकडून टॅक्सीवाल्याने जास्त भाडे आकारण्याचा प्रकार अनेकदा घडल्याचे तुम्ही ऐकले असेल, काहींना हा अनुभव प्रत्यक्षात देखील आला असेच. पण टॅक्सीवाले फार फार तर शंभर एक रुपये जास्त भाडे आकारत असेल. पण ओला या खाजगी टॅक्सी कंपनीने एका प्रवाशाला इतके मोठे बिल पाठवले की त्या बिलाच्या पैशात नवी कोरी गाडीही विकत आली असती. शे पाचशे किंवा हजार दोन हजार नाही तर ओलाकडून या प्रवाशाला तब्बल ९ लाख पंधरा हजारांचे बील पाठवण्यात आले.
रतीश शेखर असे या प्रवाशाचे नाव आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने यासंदर्भाची माहिती दिली. रतीश शेखर हा एका सरकारी प्रकल्पातर्गंत सल्लागार म्हणून काम करतो. जुबली हिल हैदराबाद ते निझामाबाद असा प्रवास ओलाने या प्रवाशाने केला. या प्रवासात तो २ तास थांबला होता. प्रवासाचे बील जवळपास पाच हजारांच्या आसपास झाले होते. पण त्यानंतर ओला या कंपनीने इतके मोठे बिल पाठवले की ते पाहून रतीश यांना घामच फुटला. ओलाकडून त्यांना ९ लाख १५ हजार ८८७ रुपयांचे बिल पाठवण्यात आले. हे बील पाहून आपण स्वप्न तर पाहत नाही ना असा जणू भासच आपल्याला झाला अशी प्रतिक्रिया देखील रतीश यांनी दिली.
यासाठी ओलाच्या अॅपवर पाहिले असता ८५ हजार किलोमीटर इतका प्रवास केला त्यामुळे हे बील पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी ४५० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. हे बील पाहून चालक देखील थक्क झाला. पण नंतर मात्र ओलाने लाखोंचे बिल पाठवल्याबद्दल रतीश यांची माफी मागितली आहे. तांत्रिक बिघाडामुळे आकडेवारी चुकल्याचे स्पष्टीकरण देत ओलाने माफी मागितली आहे.