हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या एन्काउंटरच्या वृत्तानंतर सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच सोशल मिडियावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना काही दिवसांपूर्वीच एका युझरने दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच एन्काउंटर घटनाक्रम घडल्याची चर्चा आहे. या सल्ल्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत.

आयपीएस अधिकारी असणाऱ्या व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींचा एन्काउंटर झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र त्यांनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बचावसाठी केलेल्या गोळीबारीमध्ये या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. काल (गुरुवारी) रात्री पोलिस चारही आरोपींना घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. हे वृत्त समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चार दिवसापूर्वी आरोपींना अटक केल्याची माहिती ट्विटवरुन दिली होती.

मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला एका व्यक्तीने रिप्लाय करुन आरोपींना घटनास्थळी नेऊन तेथे काय झाले हे त्यांना विचारावे. त्यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि तेव्हाच त्यांना गोळ्या घाला असा सल्ला दिला होता. आता याच ट्विटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर हे अकाऊंट डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळेच हेच ट्विट वाचून बलात्काऱ्यांचा एन्काउंटर करण्याचा निर्णय घेतला का असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या ट्विटवरु चर्चा रंगली असली तरी हे ट्विट खोट असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. यामागील सत्य काहीही असलं तरी नेटकऱ्यांना या निमित्ताने चर्चेला एक विषय मिळाला हे मात्र खरं.