माझी आयआयएमची प्रवेश परीक्षा चुकली हे माझे भाग्यच आहे. असे इन्फोसिसचे को-फाऊंडर नंदन निलेकणी म्हणाले. जर मी ही परीक्षा दिली असती तर माझी नारायण मूर्तींशी भेट झाली नसती. मी नोकरीच्या शोधात असताना माझी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी मला एक लहान नोकरी देऊ केली आणि त्यानंतर आमचे नाते सुधारत गेले. मग माझा इन्फोसिसमधला प्रवास सुरु झाला…बाकी सगळे जगासमोर आहेच.

बंगळूरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जर ते आयआयएमची प्रवेश परीक्षा पास झाले असते तर आज ते साबणाच्या किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनीत मॅनेजर पदावर नोकरी करत असते. मात्र आयआयटीमध्ये घालविलेला काळ मला स्वतःची ओळख करुन देणारा होता. या काळात मी लिडर होऊ शकतो हे माझ्या लक्षात आले.

मी अतिशय सामान्य मुलगा होतो. मात्र ज्यावेळी मी आयआयटीमध्ये गेलो तेव्हापासून माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वपूर्ण बदल घडत गेले. याचवेळी मोठ्या शहरातील वातावरण, येथील मित्र यामुळे नकळत माझा आत्मविश्वास वाढत गेला. हा काळ माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला असंही ते म्हणाले.