पाकिस्तानच्या ताफ्यातील मध्यमगती गोलंदाज वहाब रियाजची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरी पाहता वहाबला चक्क एका ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी असा प्रकार घडला आहे. ई-बे या ई-कॉमर्स वेबसाईटवर वहाबचे फोटो अपलोड करण्यात आले असून त्याला चक्क ४८ रुपयांत विक्रीसाठी ठेवण्यात आलंय. ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर ई-बेच्या वेबसाईटवरून हे फोटो तातडीने हटवण्यात आले आहे. पण या जाहिरातीचा स्क्रीन शॉट मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकदिवसीय सामन्यातील ७५ हून अधिक सामन्यांचा अनुभव वहाबच्या पाठीशी आहे. परंतु, त्याची कामगिरी मात्र निराशाजनकच होती. ‘वहाबला २००८ मध्ये संघात घेतलं होतं, तेव्हा असं वाटलं होतं की हा पाकिस्तान संघाला सामने जिंकून देईल. २०१५ पर्यंत वाटलं होतं की सगळं ठिक होईल. पण नंतर लक्षात आलं की खेळाडू संघासाठी अकार्यक्षम आहे, हा खेळाडू फक्त शेन वॉटसनसारख्यांना घाबरवू शकतो पण त्यांची विकेट मात्र काढू शकत नाही.’ अशी खोचक पद्धतीची टीका वहाबच्या फोटोसोबत जोडण्यात आली. ही जाहिरात पाहून अनेकांना आपलं हसू अनावर होत आहे. तेव्हा सोशल मीडियामध्ये वहाबवर जोक्स व्हायरल होत आहे.

वहाबला असं ट्रोल करण्याची चाहत्यांची ही काही पहिली वेळ नाही. भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात वहाबच्या इभ्रतीचा चक्क ‘कचरा’ करण्यात आला होता. ‘लगान’ चित्रपटातील आमिर खानच्या संघातील कचरापेक्षा खराब खेळी वहाबची आहे, असं सांगत त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.