चोरी करण्यासाठी चोर कधी काय करतील सांगता येत नाही. चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी ते अशी काही शक्कल लढवतात की विचारायलाच नको. नुकतेच एका चोराने आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून असाच काहीसा प्रकार केला आहे. अमेरिकेतील केंटकी येथे एका चोराने कोकाकोलाचा वेश करुन एका फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये चोरी केली. आता ही कल्पना या चोराला कुठून सूचली हे देवच जाणे.

‘कोकाकोला’च्या बॉटलसारखी वेशभूषा केल्याने सीसीटीव्हीमध्ये आपली ओळख पटू शकणार नाही असे चोरट्याला वाटल्याने त्याने ही शक्कल लढवली असावी. यात तो काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र त्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाच. हिंडरसन पोलिस विभागाने त्यांच्या फेसबुक पेजवर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे. रेस्टॉरंटच्या मागच्या दाराने येत या चोराने चोरी केल्याचे आपल्याला यामध्ये पहायला मिळते. चोरीची ही अनोखी पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चोर हातात बंदूक घेऊन रेस्टॉरंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी हा कोणीतरी भिकारी असावा असे समजून मॅनेजर त्याला ब्रेड खाण्यासाठी देतो. पण कोकाकोलाचा वेश केलेला हा चोर बंदूक दाखवून रेस्टॉरंटमध्ये शिरतो आणि तब्बल ५०० डॉलर्सची चोरी करतो. चोरी झाल्यानंतर तो तिथून अतिशय शिताफीने पळही काढतो. राखाडी रंगाच्या मिनीव्हॅनमधून तो निघून जातो. चोरीच्या वेळी रेस्टॉरंट सुरु नसते. मात्र रेस्टॉरंटचे मॅनेजर यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे चोरीदरम्यान तो मॅनेजर किंवा इतर कोणालाही इजा पोहचवत नाही.

याआधीही एका चोराने आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून चेहऱ्यावर टॉयलेट पेपर गुंडाळून चोरी केली होती. दुकानात शिरण्यापूर्वी चेहऱ्यासमोर कागद पकडून त्याने सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. तेव्हा या अतिहुशार चोराला पकडायला पोलिसांना फार वेळ लागला नाही.